नवरात्रीत मांस विक्री करणारे देशद्रोही- भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:55 PM2019-04-09T16:55:38+5:302019-04-09T16:57:32+5:30
भाजपानं आमदारानं मतदारसंघातील दुकानं केली बंद
गाझियाबाद: भाजपाआमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मांस विक्रेत्यांना दुकानं बंद करण्याच्या सूचना केल्या. नवरात्रीत मांस विक्री करणारी दुकानं सुरू ठेवणं देशद्रोह असल्याचं गुर्जर म्हणाले. गुर्जर गाझियाबादमधल्या लोणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
'लोणीतील मंदिरांच्या परिसरात मांस विक्रीची दुकानं सुरू होती. ती अनधिकृत आहेत. हा देशद्रोह आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही', असं नंदकिशोर गुर्जर म्हणाले. मात्र या प्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार झाली नसल्याची माहिती गाझियाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यू. के. अग्रवाल यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी भागातल्या मांस विक्री करणाऱ्या दुकानांना आणि कत्तलखान्यांना देण्यात आलेले परवाने 2017 नंतर नियमित करण्यात आले. त्यानंतर या भागात मांस विक्री करणाऱ्या दुकानांच्या तक्रारी आल्या नव्हत्या. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात सत्तांतर झालं. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कत्तलखान्यांविरोधात कारवाई सुरू झाली. धार्मिक वास्तूच्या 50 मीटर परिसरात मांस विक्री करणारी दुकानं असू नयेत, असा कायदा करण्यात आला.
नवरात्र सुरू झाली आहे आणि अशा काळात प्राण्यांची कत्तल करणं पूर्णपणे चूक आहे. उद्या यामुळे परिसरात काही घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल गुर्जर यांनी उपस्थित केला. 'मी त्यांना निवेदन दिलं आणि हे सर्व चूक असल्याचं सांगितलं. तसं मी कोणालाही विनंती करत नाही. पण त्यांना मी सांगितलं की हे चांगलं नाही आणि त्यांनी दुकानं बंद केली', असं गुर्जर म्हणाले.