Operation Amritpal: अमृतपाल सुवर्ण मंदिरात येणार, सरेंडर करण्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:10 PM2023-03-29T16:10:53+5:302023-03-29T16:12:16+5:30
Operation Amritpal: मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे की, अमृतपाल सुवर्ण मंदिरात जाऊन आत्मसमर्पण करणार आहे.
Operation Amritpal: गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमृतपाल पंजाबमधील सुवर्ण मंदिरात माध्यमांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे पंजाब पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सध्या सुवर्ण मंदिराबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
अमृतपाल सुवर्ण मंदिरात दरबार साहिबमध्ये प्रवेश करण्याचा आणि श्री अकाल तख्त साहिबमध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती यंत्रणांना आहे. त्यानंतर तो मीडियाच्या उपस्थितीत सार्वजनिकपणे आत्मसमर्पण करेल. सध्या या परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात अमृतपालच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अमृतपाल 18 मार्चपासून वॉण्टेड
पंजाब पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी 18 मार्चपासून खलिस्तान समर्थक वारीस पंजाब दे संघटनेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली होती. तेव्हापासून अमृतपाल फरार आहे. तो 18 मार्च रोजी जालंधरमधून पळून गेला होता. अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या अनेक गुन्हेगारी आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. पण, तो कारमधून पळून गेला. यादरम्यान त्याने तीन-चार जणांना कारने उडवले. नंतर तो कार तिथेच सोडून पळून गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत अमृतपाल वेगवेगळी वेशांतरे करुन आपली ठिकाणे बदलत आहे. पोलिसांनी या काळात त्याच्या अनेक साथीदारांनाही अटक केली आहे.