ऑपरेशन बारबाला! संसदेपासून ५०० मीटर अंतरावर अय्याशीचा खेळ रंगला; काय आहे Mumbai Dreams?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:45 AM2021-08-04T07:45:01+5:302021-08-04T07:47:57+5:30
मुंबईत अनेकदा बारबालांबद्दल तुम्हीत पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. परंतु २४ जुलैला दिल्लीतील पंचकुइया रोड आणि पहाडगंज परिसरात बारमध्ये हा प्रकार घडत होता.
नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कोरोना काळात अय्याशीचा खेळ सुरू आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली आहे. संसदेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हा प्रकार घडत आहे. हे कृत्य ना कोणी थांबवत आहे ना कोणी त्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे नेमका कुणाच्या इशाऱ्यावर उघडपणे अय्याशी सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो.
मुंबईत अनेकदा बारबालांबद्दल तुम्हीत पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. परंतु २४ जुलैला दिल्लीतील पंचकुइया रोड आणि पहाडगंज परिसरात बारमध्ये हा प्रकार घडत होता. बारमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजात बारबाला अंगप्रदर्शन करत होत्या. त्यांच्या बाजूला अनेक गिऱ्हाईक नोटांचा पाऊस पाडत होते. काही टेबलावर हुक्का ओढताना दिसत होते. शनिवारचा दिवस असल्याने संपूर्ण मैफील रंगली होती. ही सगळी दृश्य गुप्त कॅमेऱ्यात कैद झाली.
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सगळे VVIP नेते, मंत्री, खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहे. संसदेपासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर हा अय्याशीचा खेळ रंगला होता. प्रशासनाच्या नाकावर टिचून मोठ्या आवाजात हा प्रकार सुरू होता मात्र कुणाला ऐकायला आला नाही? कुठे होता कोरोना प्रोटोकॉल? दिल्लीत बारबाला कुठून आल्या? त्याठिकाणी तैनात असलेल्या बाऊंसरला त्या बारचं नाव विचारलं असता त्याने सांगितले मुंबई ड्रीम्स..सध्या नाव चेंज करायचं आहे त्यामुळे बोर्ड हटवण्यात आला होता. एका हॉलमध्ये ३ बार चालवले जातात. तिन्ही ठिकाणी बारबाला डान्स करत असतात.
याठिकाणी कॅमेरा आतमध्ये नेला असता नशेत धुंद लोक वेगळ्याच दुनियेत असल्याचं दिसून आलं. ना मास्क, ना सोशल डिस्टेसिंग आणि ना कोणत्याही कायद्याची भीती..संपूर्ण खेळ मालकानं सेट केला होता. स्टिंग ऑपरेशनमध्ये मालकानं सांगितलं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ना कुठलाही व्हिडिओ बाहेर जाईल ना प्रशासनाचा कुणीही आत येईल. चिंता न करता मज्जा करा. इतकचं नाही तर या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही पोलिसही नजर आले. कायद्याच्या नावाखाली पैशाची वसुली सुरू होती. संसदेपासून ५०० मीटर अंतरावर हे सगळं सुरू होतं मात्र कुणालाही याची भनक नव्हती. कोरोना महामारी काळात पैशासाठी लोकांचा जीव धोक्यात घातला जात होता. मग या प्रकाराला जबाबदार कोण? हा प्रश्न आता विचारला जात आहे.