Jammu Kashmir : दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम, चकमकीचा सोळावा दिवस, आतापर्यंत ९ जवान झाले शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:15 AM2021-10-27T05:15:30+5:302021-10-27T05:15:57+5:30
Jammu Kashmir : आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत.
- सुरेश डुग्गर
जम्मू : गेले १६ दिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी आता जोरदार मोर्चेबांधणी केली असून, या अंतिम हल्ल्यात जंगलात लपून बसलेल्या सर्व अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी जवान सज्ज झाले आहेत. आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत.
मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत.
पाकिस्तानातील काही माजी लष्करी अधिकारी त्यांना तेथून मदत करीत आहेत. या अतिरेक्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणही मिळाले आहेत. आतापर्यंतच्या चकमकीत १३ दहशतवादी ठार झाले असले तरी त्यापैकी अनेकांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे जवानांनी मंगळवारी हेलिकॉप्टर व ड्रोन यांची मदत घेतली आणि लष्करी युद्धाच्या मार्गाने त्यांच्यावर अंतिम हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.
अतिरेक्याच्या शोधासाठी अतिरेकी
अतिरेक्यांचा शोधण्यासाठी जवानांनी रविवारी तुरुंगातील मुस्तफा नावाच्या दहशतवाद्यांची मदत घेतली होती. त्याच्यासह जवान जंगलात पोहोचताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात मुस्तफा ठार झाला आणि एक जवान जखमी झाला. मुस्तफा पाकिस्तानी होता. त्यानंतर सोमवारी सुमारे तीन तास दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू राहिला.