Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 07:44 AM2023-04-22T07:44:06+5:302023-04-22T07:45:17+5:30
Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. महाराष्ट्राबाबत भाजपच्या सर्व नजरा २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपला लोकसभेच्या किमान ४० जागा जिंकायच्या आहेत.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, कर्नाटक निवडणुकांनंतर महाराष्ट्रात संपूर्ण ऑपरेशन तडीस नेले जाईल. १० मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणुका होणार. १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र व बिहारमध्ये लोकसभेच्या ४० किंवा ४० पेक्षा जास्त जागा आहेत.
महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे नेतेही वक्तव्ये देत आहेत. असे असतानाच स्वत: अजित पवार यांनी मात्र जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहीन, असे स्पष्ट केले. शरद पवार यांनीही अजित पवार यांच्याबाबत चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले असले तरी भाजप नेत्याचा दावा आहे की, राष्ट्रवादीचा एक मोठा गट भाजपबरोबर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात शिंदे गटाच्या शिवसेनेबरोबर आणखीही पाठिंब्याची गरज आहे.
अमित शाह यांच्याकडे सूत्रे
अमित शाह स्वत: महाराष्ट्राच्या ऑपरेशनची सूत्रे हालवत आहेत. अलीकडेच शाह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुंबईतील घरी गेले तेव्हाही हे ऑपरेशन पुढे ढकलल्याची चर्चा सुरू झाली. याच ऑपरेशनमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
बिहारी नेत्यांनाही सबुरीचा सल्ला
- दोन दिवसांपूर्वीच उपेंद्र कुशवाह शाह यांना भेटून परतले. त्यांनाही कर्नाटक निवडणुकांपर्यंत थांबण्यास सांगितले.
- माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनीही शाह यांची भेट घेतली. त्यांनाही कर्नाटक निवडणुकीपर्यंत थांबण्यास सांगितले. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.