ऑपरेशन सक्सेस... महिलेच्या डोळ्यातून चक्क 3 जिवंत माशा काढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:30 AM2022-02-23T10:30:50+5:302022-02-23T10:32:07+5:30
महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन डोळ्यातील बोटफ्लाई म्हणजेच माशा बाहेर काढण्यात आल्या आहेत
दिल्लीतील वसंत कुंज येथील फोर्टीस रुग्णालयात एका महिलेच्या डोळ्यातून चक्क 3 जिवंत माशा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. या महिलेला गेल्या 4 ते 6 आठवड्यांपासून डोळ्यात सूज आणि खाज येत होती. मात्र, होणारा त्रास वाढत गेल्यामुळे महिलेनं रुग्णालयात डॉक्टरांना दाखवला. त्यावेळी, महिलेच्या डोळ्यात बोटफ्लाई असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन करुन त्या माशा बाहेर काढण्याचं ठरलं.
महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन डोळ्यातील बोटफ्लाई म्हणजेच माशा बाहेर काढण्यात आल्या आहेत. या माशांच साईज 2 cm एवढी होती. 32 वर्षीय ही महिला दोन महिन्यांपूर्वी अमेजनच्या जंगलात फिरण्यासाठी गेली होती. या पर्यटनावरुन परतल्यानंतर त्यांच्या डोळ्यात हा त्रास सुरू झाला. उजव्या डोळ्याला सूज आली होती, महिलेच्या डोळ्याला अधिक त्रास जाणवू लागल्याने तिने डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, तिथील डॉक्टरांना बोटफ्लाई काढण्यात आली नाही.
महिलेने दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी, 10 ते 15 मिनिटांच्या शस्त्रक्रियेतून त्यांच्या डोळ्यातील 3 माशा (बोटफ्लाई) बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे महिलेला बेशुद्ध होण्याचे कुठलंही इंजेक्शन या शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात आलं नाही. याउलट, शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच महिलेचा रुग्णालयात डिस्चार्जही देण्यात आला.
रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख आणि सल्लागार डॉ. मोहम्मद नदीम यांनी म्हटले की, हा मायियासिसचा दुर्लभ प्रकार होता, आम्ही रुग्णाच्या डोळ्यातून तीन जिवंत माशा बाहेर काढल्या आहेत. आता, महिलेची प्रकृती स्थीर आहे. मात्र, जर ह्या माशा काढण्यात आल्या नसत्या, तर नाक आणि चेहऱ्यावर याचा परिणाम होऊन जीव गमावण्याचा धोका निर्माण झाला असता, असेही डॉ. नदीम यांनी सांगितले.