होमी भाभांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 01:20 PM2017-07-31T13:20:32+5:302017-07-31T14:40:42+5:30
भारताच्या अणुसंशोधनाचे जनक होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा दावा TBRNews.org वेबसाइटनं केला आहे.
नवी दिल्ली, दि. 31 - भारताच्या अणुसंशोधनाचे जनक होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा दावा TBRNews.org वेबसाइटनं केला आहे. फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाचे जे विमान कोसळले त्या विमानात भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभासुद्धा होते. त्यांचासुद्धा या अपघातात मृत्यू झाला. मात्र आता हा अपघात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएनं घडवून आणल्याचा दावा TBRNews.org या वेबसाइटनं केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे मानवी शरीराचे अवशेष सापडले होते. हे अवशेष एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांचे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. 50 वर्षांपूर्वी एअर इंडियाची दोन प्रवासी विमाने या भागात कोसळली होती. विमान अपघातानंतर दुर्घटनास्थळी डॅनियल रॉची यांचे बॉसन्स ग्लेशिअरमध्ये अनेक वर्षापासून शोधकार्य सुरू होते. गुरुवारी त्यांना हे अवशेष सापडले. जानेवारी 1966 मध्ये मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेले एअर इंडियाचे बोईंग 707 विमान माँट ब्लान्स इथे कोसळले होते. त्यावेळी विमानातील 117 जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 1950 साली याच भागात एअर इंडियाचे एक विमान कोसळले होते. त्यावेळी विमानात 48 जण होते.
TBRNews.org नावाच्या वेबसाइटनं होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. या वेबसाइटवर 11 जुलै 2008मध्ये पत्रकार ग्रेगरी डग्लस व सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली यांच्यातील कथित संवाद टाकण्यात आला आहे. सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली यांना होमी भाभांच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या कार्यक्रमाची भीती होती. आमच्यासमोरील समस्या तुम्हाला ठाऊक होती. भारताने 60च्या दशकात अणुबॉम्ब बनवण्याची तयारी केली होती, असं रॉबर्ट टी क्राओली बोलल्याची माहिती या वेबसाइटनं दिली होती. या सर्व संभाषणात रॉबर्ट यांनी रशियाचासुद्धा उल्लेख केला होता. रशिया भारताला अणुबॉम्ब बनवण्यासाठी मदत करत असल्याचे रॉबर्ट यांनी पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना सांगितले होते, अशी माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. सीआयएचा अधिकारी आणि पत्रकार ग्रेगरी डग्लस यांच्या चर्चेत होमी भाभा यांचादेखील उल्लेख होता. माझ्यावर विश्वास असू द्या, ते फारच धोकादायक होते. त्यांना एक दुर्दैवी अपघात झाला. समस्या वाढवून अधिक त्रास देण्यासाठी ते व्हिएन्नाला जात होते. त्याच वेळी त्यांचं बोइंग 707 विमान दुर्घटनाग्रस्त झालं, असं पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली म्हणाल्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली होती.