opinion poll : आज निवडणूक झाल्यास भाजपा बहुमत गमावणार, तरीही एनडीए सत्तेसमीप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:40 PM2019-03-10T22:40:17+5:302019-03-10T22:40:45+5:30
आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल वाजले आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार आज निवडणुक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 264 जागा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 141 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाल्यास कुठलाही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही.
या सर्व्हेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 265 जागा मिळतील. तर यूपीएला 141 जागा मिळतील. इतर पक्षांना 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय पाहिल्यास भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला 220 जागा मिळतील. तर काँग्रेसला 86 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 टक्के, तर यूपीएला 31 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना 28 टक्के मतदान होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.