ओप्पो कंपनीकडून ४,३८९ कोटी रुपयांची करचोरी, मनी लाँड्रिंगचाही ठपका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:13 AM2022-07-14T06:13:34+5:302022-07-14T06:14:09+5:30

आणखी एक चिनी कंपनी रडारवर

Oppo also accused of tax evasion of Rs 4389 crore and money laundering one more chinese company on radar | ओप्पो कंपनीकडून ४,३८९ कोटी रुपयांची करचोरी, मनी लाँड्रिंगचाही ठपका 

ओप्पो कंपनीकडून ४,३८९ कोटी रुपयांची करचोरी, मनी लाँड्रिंगचाही ठपका 

Next

देशात मोबाईल विक्रीत लक्षणीय हिस्सेदारी असलेल्या ओप्पो कंपनीने सीमा शुल्कापोटी तब्बल ४,३८९ कोटी रुपयांची चोरी केल्याची बाब केंद्रीय महसूल गुप्तचर संस्थेने केलेल्या तपासणीत उजेडात आली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कंपनीच्या देशभरात विविध कार्यालयांवर, कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या घरावर छापेमारी करीत अनेक कागदपत्रे, संगणक ताब्यात घेतले.

उपलब्ध माहितीनुसार, चीन आणि अन्य काही देशांतून मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुटे भाग कंपनी भारतात आयात करते आणि भारतात त्याची जोडणी करून विक्री करते. आयात शुल्क लागू असूनही या सुट्या भागांची आयात करताना कंपनीने त्यांची नोंदणी आयात शुल्क लागू नसलेल्या घटकांखाली केली. या माध्यमातून कंपनीने तब्बल २,९८१ कोटी रुपयांची चोरी केली आहे. गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गैरप्रकार झाल्याचे मान्य केले आहे. एकीकडे करचोरीच्या मुद्द्याची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने भारतात केलेल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नापैकी काही भाग चीनमधील कंपन्यांना पाठवल्याचेही तपासादरम्यान दिसून आले आहे. 

चीनमधे मुख्यालय असलेल्या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांना, कंपनीच्या तंत्रज्ञानासाठी रॉयल्टी, परवाना शुल्क यापोटी १,४०८ कोटी रुपये हस्तांतरित केले. त्यामुळे या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचाही केंद्रीय महसूल गुप्तचर संघटनेला संशय असून, त्या अनुषंगानेही आता पुढील तपास होणार आहे. 

तीन महिन्यांत तिसरी चिनी कंपनी...

  • ३० एप्रिल २०२२ : शाओमी या चिनी कंपनीवर ईडीने छापेमारी केली. कंपनीच्या देशभरातील बँक खात्यात असलेली ५५०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत ही कारवाई झाली होती. 
  • ७ जुलै : ईडीने व्हिवो या चिनी कंपनीवर छापेमारी करीत कंपनीच्या ४६५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली होती. 
  • १३ जुलै : ओप्पो कंपनीवर झालेली कारवाई ही तिसऱ्या चिनी कंपनीवर झालेली कारवाई आहे. 


मोबाइल ॲप कंपन्यांवरही लक्ष
मोबाईल ॲपच्या माध्यमातून लहान रकमेची कर्जे देत नंतर ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करणारी अनेक ॲप देशात सध्या धुमाकूळ घालत आहे. यांतील अनेक ॲपचे उगमस्थान चीनमध्ये असल्याची माहिती गेल्या महिन्यात ईडीने केलेल्या कारवाईदरम्यान पुढे आली होती. अशी सुमारे ६०० ॲप ईडीच्या रडारवर आहेत.

Web Title: Oppo also accused of tax evasion of Rs 4389 crore and money laundering one more chinese company on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.