राज्यसभेत विरोधक आक्रमक; कामकाज स्थगित, नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:21 AM2017-12-16T01:21:19+5:302017-12-16T01:21:26+5:30
गुजरात निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध वक्तव्ये करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत शुक्रवारी विरोधी पक्षांनी आक्रमक रूप धारण केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध वक्तव्ये करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत शुक्रवारी विरोधी पक्षांनी आक्रमक रूप धारण केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी उमटले. विरोधी पक्षांनी याचा जाब सरकारला विचारला. या गदारोळात काँग्रेस आणि सपाचे सदस्य पुन्ह:पुन्हा समोरच्या भागात येत घोषणाबाजी करीत होते. यावेळी विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान यांचे नाव न घेता स्पष्ट केले की, हे आरोप न केवळ सरकारसाठी, तर विरोधी पक्षांसाठीही गंभीर आहेत. गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान, माजी सैन्य प्रमुख आणि माजी अधिकारी यांच्याबाबत गंभीर आरोप केल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षांची नोटीस स्वीकारली नसल्याचे सभापतींनी स्पष्ट करताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले आणि गदारोळातच कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.