विरोधकांचा आरोप राजकीय हेतूनेच टीप : सदर बातमी आजच अंबडला पाठविणे अपेक्षित
By admin | Published: March 18, 2016 11:44 PM2016-03-18T23:44:57+5:302016-03-19T00:02:35+5:30
दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगी
दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगी
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध संस्थांकडून ११ पुरस्कार मिळाले आहे. व्यवसायात झालेली लक्षणीय वाढ व बॅँकेची झालेली चौफेर प्रगती याला नजरेआड करत विरोधी गटाच्या संचालकांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले असल्याचे प्रतिउत्तर बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिले आहे.
रिझर्व्ह बॅँकेकडून व्यापारी बॅँकेला आठ नवीन शाखा उघडण्याची परवानगी दिली आहे. याबाबत विरोधी गटाच्या पाच संचालकांनी नवीन शाखा उघडण्यास विरोध दर्शवून बॅँक नुकसानीच्या दिशेने वाटचाल करेल असा आरोप केला होता. याबाबत शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत बॅँकेने अद्ययावत डाटा सेंटर, रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या निर्धारित वेळेच्या आत पूर्ण केलेले कोअर बॅँकिंग, एटीएम सेंटर सुविधा या बाबींची पूर्तता केली. २००४ साली बॅँकेचा ढोबळ एनपीए ४९ टक्के असताना बॅँकेस १ कोटी २० लाख रुपयांचा तोटा झाला होता. रिझर्र्व्ह बॅँकेच्या निर्बंधामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बॅँकेला वाटचाल करावी लागली. विद्यमान संचालकांच्या कार्यकाळात बॅँकेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होऊन बॅँकेने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने बॅँकेने नवीन शाखांची परवानगी मागितली होती.
नवीन शाखांसाठी रिझर्व्ह बॅँकेचे आवश्यक असलेले सीआरएआर १० टक्क्यापेक्षा जास्त, ढोबळ एनपीए ७ टक्क्यापेक्षा कमी व निव्वळ एनपीए ३ टक्क्यांपेक्षा कमी, गेल्या ४ वर्षांपैकी सलग ३ वर्षे बॅँक सतत नफ्यात असावी, मागील आर्थिक वर्षात सीआरआर / एसएलआर यांचे उल्लंघन नसावे. सशक्त अंतर्गत नियमन प्रणाली व संचालक मंडळात कमीत कमी दोन व्यावसायिक संचालकांची नेमणूक, बॅँक कोअर बॅँकिंग सोल्युशनने पूर्ण असावी, गेल्या तीन वर्षात आरबीआय कडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक दंड झालेला नसावा किंवा नियमांचा भंग केल्याबद्दल आरबीआयकडून ताकीद मिळालेली नसावी, हे सर्व निकष बॅँकेने पाळल्यानेच बॅँकेला नवीन शाखांना परवानगी मिळाल्याचे स्पष्टीकरण दिले.
विरोधी संचालकांनी नवीन शाखा सुरू केल्यास बॅँकेची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ती चुकीची असून व्यवसायाच्या शाखा वाढल्या तरच व्यवसायाची भरभराट होते हे लक्षात घ्यायला हवे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, रंजना बोराडे, डॉ. डी. जी. पेखळे, श्याम चाफळकर, डॉ. प्रशांत भुतडा, मनोहर कोरडे, भाऊसाहेब पाळदे आदि संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)