माझ्याविषयीच्या द्वेषामुळेच विरोधक एकत्र येत आहेत- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 05:58 AM2018-07-04T05:58:56+5:302018-07-04T05:58:56+5:30
माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.
नवी दिल्ली : माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.
‘स्वराज्य’ नामक आॅनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी आपण शहेनशहा वा घराण्याची सत्ता राबविणारा नेता नाही. मी लोकांतून निवडून आलेला प्रतिनिधी आहे, त्यामुळे माझी जनतेशी कायमच नाळ जोडलेली राहील, असेही म्हटले आहे. या मासिकाने जीएसटीसंबंधात मोदी यांनी केलेली विधाने १ जुलै, जीएसटी दिनी प्रसिद्ध केली होती. उर्वरित राजकीय भाग मंगळवारी प्रसारित केला असून, त्यात मोदी यांनी विरोधी पक्षांकडे देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम नसल्याचाही आरोप केला आहे. देशाच्या विविध भागांत होणारे दहशतवादी हल्ले हा इतिहास झाला आहे, यूपीए सरकारच्या काळातच ते होते, असे सांगून जम्मू-काश्मीरमध्ये जबाबदार व उत्तरदायी प्रशासन देण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, नक्षलवाद्यांच्या हिंसाचारातही कमालीची घट झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी आमच्या सरकारची भूमिका असून, पायाभूत सुविधा व सामाजिक विकास यालाच आमचे सरकार प्राधान्य देत आहे, असेही ते म्हणाले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर नक्षल प्रभावित ३४ जिल्ह्यांमध्ये ४५00 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले, २४00 मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले आणि आणखी ४0७२ टॉवर्सना परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर ११ जिल्ह्यांत मिळून नवोदय व जवाहर केंद्रीय विद्यालये सुरू झाली आहेत, त्यामुळे नक्षलग्रस्त भागांतील लहान मुलांना शिक्षण मिळू लागले आहे, असे मोदी यांनी मुलाखतीत नमूद केले. देशातील १२६ जिल्हे पूर्वी नक्षलग्रस्त होते. पण त्यापैकी ४४ जिल्ह्यांतील त्यांचा प्रभाव संपवण्यात आम्हाला यश आले आहे, असे ते म्हणाले.
ईशान्येकडील राज्यांत आतापर्यंत विकासाची गंगा पोहोचली नव्हती, आम्ही सत्तेवर येताच त्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले, तेथील दहशतवाद मोडून काढला, तेथे अनेक पायाभूत सुविधा दिल्या, आज तेथे विकासाची कामे जोरात सुरू आहेत, अरुणाचल प्रदेशात प्रथमच व्यावसायिक विमान सेवा आता सुरू झाली आहे, त्या राज्यांतील राजकीय अस्थैर्य संपले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसची धावपळ स्वार्थासाठी
गेल्या चार वर्षांत जवळपास सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला, त्यामुळे त्या पक्षाचा उद्दामपणा, उर्मटपणा संपत चालला आहे. खरे तर मतदारांनीच मतपेटीतून तो संपवला आहे. त्यामुळे आघाडीमार्फत ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आता अन्य राजकीय पक्षांच्या मागे धावताना दिसत आहे. अर्थात केवळ स्वार्थासाठी काँग्रेसची ही धावपळ आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
मला ऊ र्जा जनतेतूनच मिळते
सुरक्षेविषयी विचारता पंतप्रधान म्हणाले की, मी जनतेतून आलेला माणूस आहे. मी विविध ठिकाणी जातो, तेव्हा हजारो लोक माझ्या स्वागतासाठी येतात, ते मला हात करतात, बंदिस्त कारमधून त्यांच्या दिशेने हात दाखवणे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कारमधून खाली उतरतो, त्यांच्याशी हस्तांदोलन करतो, त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. हे लोकच माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून मला प्रचंड ऊ र्जा मिळते.