विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:30 AM2019-10-07T00:30:29+5:302019-10-07T00:30:51+5:30
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याची टीका तद्दन बिनबुडाची व निखालस बोगस आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना राजकीय सूडभावनेने विविध प्रकरणांमध्ये अडकवत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी साफ फेटाळून लावला असून, सरकारविरुद्ध मांडता येईल असा कोणताही विषय नसल्याने विरोधी पक्ष दिवाळखोर झाले असल्याचा त्यांनी आरोप केला.
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याची टीका तद्दन बिनबुडाची व निखालस बोगस आहे. ते म्हणाले की, न्यायालयांना या नेत्यांवरील आरोपात सकृतदर्शनी तथ्य असल्याचे वाटले म्हणून न्यायालयांनी जामीन नाकारल्याने हे नेते तुरुंगात आहेत.
मोदी सरकारला प्रसिद्धीचा हव्यास आहे व म्हणूनच ते नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी धडपडत असतात, या टीकेला उत्तर देताना जावडेकर म्हणाले की, सरकार आणि भाजप लोकांसाठी अहोरात्र काम करीत आहे. यासाठी आम्ही केलेल्या कामगिरीच्या हजारो गोष्टी सांगू शकतो. जे केले ते सांगण्यात काय गैर आहे?