विरोधक धर्मसंकटात; श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत द्विधा स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:20 AM2023-12-27T05:20:46+5:302023-12-27T05:22:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्याला जावे की नाही, याबाबत विरोधक विचार करीत आहेत.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेने विरोधी पक्षांना धर्मसंकटात टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्याला जावे की नाही, याबाबत ते विचार करीत आहेत.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात देशातील ५ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मागील ३५ वर्षांत श्रीराम मंदिराचा मुद्दा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला होता. या मुद्यावर भाजपने देशभर निवडणुका लढवल्या होत्या व यश प्राप्त केले होते.
अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. याबाबत काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष सोहळ्याला जावे की न जावे, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. थेट नकार दिल्यास भाजपला निवडणुकीत त्यांना रामद्रोही म्हणण्याची संधी मिळेल. निमंत्रण देऊनही हे लोक आले नाहीत. अयोध्येत मंदिर व्हावे, असे यांना वाटत नव्हते, असे भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणेल. विरोधक अयोध्येत सोहळ्यासाठी गेले, तर मुस्लीम समाज नाराज होईल, अशा द्विधा मन:स्थितीत ते आहेत. सर्वांत गोंधळलेली स्थिती अखिलेश यादव यांची आहे. ते जाण्यासाठी नकार देत नाहीत. अशीच स्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसही स्पष्टपणे हो किंवा नाही म्हणू शकलेली नाही.
धर्म व्यापक विषय
सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना नृपेंद्र मिश्र यांनी निमंत्रण दिले. येचुरी यांनी त्यांना सांगितले की, धर्म हा व्यापक विषय आहे; परंतु अयोध्येत २२ जानेवारी रोजी यावर राजकारण होईल. त्यापासून आम्ही दूर राहू इच्छित आहोत. त्यामुळे आम्ही येणार नाही. आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका राष्ट्रीय पक्षांपासून प्रादेशिक पक्षांना दिल्या जातील. त्यावर काँग्रेसलाही भूमिका स्पष्ट करावी लागेल.
राम मंदिरात ९ देशांची वेळ सांगणारे घड्याळ
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी राम मंदिरासाठी काही ना काही दान दिले आहे. यातच आता लखनौ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे पेटंट असलेले घड्याळ सुपूर्द केले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी ९ देशांची वेळ सांगते. हे घड्याळ भारत, मेक्सिको, जपान, दुबई, टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन यासारख्या नऊ देशांतील शहरांची वेळ सांगते.