पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 04:08 AM2019-07-25T04:08:46+5:302019-07-25T04:09:17+5:30

काश्मीर मध्यस्थी : लोकसभेतून सभात्याग

Opponents insist on PM's explanation | पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही

पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही

Next

नवी दिल्ली : काश्मीर मध्यस्थीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी बुधवारीही गोंधळ घालत लोकसभेतून सभात्याग केला; तर दुसरीकडे सरकारने स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदी यांनी काश्मीर विषयावर ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही; परंतु विरोधकांनी पंतप्रधानांनी सभागृहात येऊन खरे काय ते स्पष्ट करावे, असा आग्रह धरत लोकसभा दणाणून सोडली.

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ओसाका येथे चर्चा झाली. ‘काश्मीरच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी मला मध्यस्थी करण्याचे साकडे घातले होते’, असा ट्रम्प यांचा दावा आहे. खरे काय? ते जनतेला जाणून घ्यायचे आहे.

ट्रम्प यांचे म्हणणे खरे किंवा खोटेही असू शकते. परंतु पंतप्रधान मोदी या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यामुळे शंका येते तेव्हा पंतप्रधानांनी सभागृहात या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे. द्रमुकचे के. टी. आर. बालू यांनीही अशीच मागणी केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह निवेदन करण्यास उभे राहिले तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, द्रमुकसह इतर विरोधी पक्षांचे सदस्य सभात्याग करीत बाहेर पडले.

प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी ट्रम्प यांनी काश्मीर मध्यस्थीबाबत केलेल्या दाव्याचा मुद्या उचलून धरत पंतप्रधान मोदी यांनीच यावर स्पष्टीकरण देण्याची आग्रही मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास चालूच ठेवला. त्यानंतर काँग्रेस आणि द्रमुक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जात घोषणाबाजी केली. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, विदेश मंत्र्यांनी या मुद्यांवर स्पष्टीकरण दिलेले आहे तेव्हा पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण मागण्यात काहीच अर्थ नाही.

काश्मीरप्रश्नी त्रयस्थाच्या मध्यस्थीचा प्रश्नच येत नाही. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काश्मीरच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. भारत काश्मीरसह पाकव्याप्त काश्मीरबाबतही पाकिस्तानशी चर्चा करील. काश्मीर हा आमच्या राष्ट्रीय स्वाभिमनाचा विषय आहे. त्रयस्थ पक्षाची मध्यस्थी सिमला कराराच्या विपरीत असेल. ओसाका (जपान) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेवेळी विदेशमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. जयशंकर यांनी मंगळवारी स्पष्टीकरणादाखल केलेले निवेदन अत्यंत प्रामाणिक आहे.

Web Title: Opponents insist on PM's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.