विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:27 AM2019-05-23T05:27:14+5:302019-05-23T05:27:25+5:30
एक्झिट पोलमुळे अस्वस्थता
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या तक्रारी, तसेच व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागण्या आणि विविध एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर पक्ष कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे नेत्यांकडून सतत केलेले आवाहन पाहता, विरोधी पक्षांनी आताच पराभवाची मानसिक तयारी ठेवली असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
काँग्रेस व सारेच विरोधी पक्ष ईव्हीएमविषयी तक्रारी करीत आले आहेत. यंत्रातील मतांची व्हीव्हीपॅट पावतीशी पडताळणी करावी, ही मागणीही केली, पण ती मान्य झालेली नाही. ईव्हीएमविषयीचे आक्षेपही मान्य झाले नाहीत. तरीही काँग्रेस व विरोधी पक्ष निकालाला एक दिवस शिल्लक असताना करतात, याचा अर्थच त्यांचा पराभव अटळ आहे, असे भाजप नेतेही सांगू लागले आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, या पोलने खचून जाऊ नका, असे आवाहन बुधवारी कार्यकर्त्यांना केले, तसेच आवाहन सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केले होते.
एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. आॅस्ट्रेलियातील ५६ एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे निघाल्याची माहिती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना केंद्रामध्ये काँग्रेसच्या आघाडीचे व आंध्र प्रदेशात तेलगू देसमचेच सरकार येईल, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजदचे तेजस्वी यादव या नेत्यांनीही एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे खरे ठरते की
एक्झिट पोल खरे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळपास सर्वच एक्झिट पोलनी रालोआला २८६ ते ३0८ जागा (स्पष्ट बहुमत) तर यूपीएला ११३ जागा, तर पक्षांना ११५ जागांचा अंदाज दिला आहे. यूपीए व अन्य पक्ष मिळून २२८ होतात. ही संख्या बहुमतास पुरेशी नाही.