निलंबनाविरुद्ध विरोधकांची एकजूट कायम

By admin | Published: August 5, 2015 11:23 PM2015-08-05T23:23:49+5:302015-08-05T23:23:49+5:30

काँगे्रसच्या २५ खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी एकजूट

Opponents remained united against suspension | निलंबनाविरुद्ध विरोधकांची एकजूट कायम

निलंबनाविरुद्ध विरोधकांची एकजूट कायम

Next

नवी दिल्ली : काँगे्रसच्या २५ खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी एकजूट दर्शवीत लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. तिकडे संसदेबाहेर सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत अन्य सहा पक्षांचे नेतेही काँग्रेसच्या धरणे आंदोलनात सहभागी झाले.
विदेशमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवीत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. या निलंबनाविरोधात सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेससह विरोधकांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. सकाळी कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे व मुस्लिम लीगचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी व राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य सभागृहात आले. मात्र, कामकाज सुरू होताच त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. प्रश्नोत्तराच्या तासात निलंबनाच्या मुद्यावर चर्चा करण्याची त्यांची मागणी लोकसभाध्यक्षांनी धुडकावून लावली. यामुळे या सर्व पक्षांनी सभात्याग केला.
राज्यसभेतही काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्यामुळे बुधवारी कामकाज होऊ शकले नाही. मध्यप्रदेशातील रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभापतींनी कामकाज पुकारले. मात्र, काँग्रेस सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. यामुळे दोन वेळच्या स्थगितीनंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संसद परिसरात काँग्रेसच्या धरणे आंदोलनात समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र्र यादव, राजदचे जयप्रकाश नारायण यादव, माकपचे पी. करुणाकरण, भाकपचे डी. राजा, आययूएमएलचे ई. अहमदखा, जदयूचे शरद यादव आदी नेते सहभागी झाले. काँग्रेस अध्यक्ष सोनियांच्या नेतृत्वात झालेल्या या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोंडी फोडण्यासाठी सरकारने आणलेल्या कुठल्याही प्रस्तावाची मला माहिती नाही. धरणे आंदोलन उद्याही सुरू राहील, असे सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेस खासदारांच्या निलंबनास आमचा विरोध आहे. मात्र, आम्ही लोकसभाध्यक्षांच्या पदाचा आदर करतो. आम्हाला बाहेर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही बाहेर बसू आणि धरणे देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
अशीही सहृदयता!
भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी बुधवारी लोकसभेत आपल्या सहृदयतेचा परिचय दिला. लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या काँग्रेसला सभागृहात येण्यासाठी राजी करायला हवे, असे ते म्हणाले. दोन दिवसांपासून समोरची आसने रिकामी आहेत. हे दु:खद आहे. काही लोकांना सत्तेत बसण्याची सवय जडते. विरोधी बाकांवर बसायची वेळ येते, तेव्हा ते अस्वस्थ होतात. मात्र, त्यांना सभागृहात येण्यासाठी तयार केले पाहिजे. सरकार व भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते आपल्या जिद्दीवर अडून आहेत; पण सरकारने आपल्या सहृदयतेचा परिचय देत, प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत, असे हुकूम सिंह म्हणाले.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पुन्हा राज्यसभेत ललित मोदीप्रकरणी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे चित्र दिसले. पहिल्या स्थगितीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच, सुषमा स्वराज यांनी ललित मोदीप्रकरणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, त्या बोलत असतानाच विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरू केला. अरुण जेटली हेही यादरम्यान बोलले. स्वराज यांनी चर्चा सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे. याउलट काँगे्रस मात्र चर्चेस अनिच्छुक आहे, असे ते म्हणाले. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांत काहीवेळी दावे-प्रतिदावे रंगले.

आपल्या २५ खासदारांच्या निलंबनाविरुद्ध काँग्रेसजन बुधवारी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले. काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्ष अमरिंदर राजा ब्रार यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी लोकसभाध्यक्षांच्या अकबर मार्गावरील निवासस्थानाकडे मार्च काढला. मात्र, पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.
निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा माराही केला. यात काही काँग्रेस कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथेही शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

संघर्ष सुरूच... लोकसभेतून काँग्रेसच्या निलंबित झालेल्या २५ खासदारांच्या प्रश्नावर बुधवारी राजधानी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी निषेध करताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे, खा. विजय दर्डा, जनता दलाचे (यु) नेते शरद यादव आदी. (दुसरे छायाचित्र) राहुल गांधी भावी रणनीतीबद्दल सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Opponents remained united against suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.