कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्राचा विपर्यास, विरोधकांनी ते नीट वाचावे, शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 05:06 AM2020-12-09T05:06:24+5:302020-12-09T05:07:30+5:30
Sharad Pawar News : कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.
नवी दिल्ली : कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले. त्या पत्राचा संदर्भ देत कृषी कायद्याला पवारांचा पाठिंबा असल्याचा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावर स्वतः पवार यांनी दिल्लीत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचा मुद्दा भरकटवण्यासाठी पत्राचा आधार घेतला जात असून, त्याला अति महत्त्व देऊ नये, असे ते म्हणाले.
बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. अर्धा तास बैठक चालली. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘विरोधकांनी पत्र नीट वाचावे.
वारंवार पत्रावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर पवार चांगलेच संतापले. कृषी कायद्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तरीही काही पत्रकार त्यांना पत्र, शेतकरी आंदोलनावरच प्रश्न विचारत राहिले. त्यावर संतप्त पवार म्हणाले, तुम्ही सारे बाहेर उभे होता ते पाहून मला बरे वाटले नाही, म्हणून मी तुम्हाला बोलावले. प्रश्नाचे एकदा उत्तर दिल्यावरही तुम्ही मला एकच प्रश्न वारंवार विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला बोलावूनच चूक केली. यापुढे तुम्हाला बोलावणार नाही, अशा शब्दांत पवारांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय कृषी कायद्यात एपीएमसीचा उल्लेख नाही
माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असा उल्लेख आहे. केंद्राचे जे कृषी कायदे आहेत त्यात एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’