विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:37 AM2019-05-15T05:37:02+5:302019-05-15T05:37:30+5:30
माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले.
बलिया : माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले.
मला शिवीगाळ करण्यापेक्षा महाभेसळ विरोधकांनी मैदानात यावे. माझी छुपी संपत्ती,फार्म हाऊस किंवा शॉपिंग मॉल दाखवून द्यावा. . माझ्याकडे आलिशान मोटार नाही. मी बंगले बांधले नाहीत. मी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले नाही, गरीबांचे पैसेही लुटले नाहीत. गरिबांचे कल्याण आणि मातृभूमीचे रक्षण हेच आयुष्याचे सर्वस्व माझ्यासाठी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
देशामधील सर्व गरिबांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मी उभा आहे. शेवटच्या समाज घटकाला ताकद देण्यासाठी काम करत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, महाभेसळ असलेले विरोधक लोकांच्या प्रतिसादाला कसे उत्तर देतात ते मला पाहायचे आहे. सपा, बसपा, कॉँग्रेस हे सर्व मला शिवीगाळ करण्यासाठी एक झाले आहेत. त्यांच्या शिव्या ऐकून मी आणखी गतीने काम करू लागतो. (वृत्तसंस्था)
जातीचे राजकारण केले नाही
आताच्या विरोधकांनी सत्तेच्या नावाखाली देशाला लुटले. जातीपातीचे राजकारण करीत नातलगांसाठी महाल बांधले. छुप्या संपत्तीचा ढीग केला. यंत्रणा त्याचा तपास करीत आहेत. माझी जात कोणती असा प्रश्न त्यांना आता पडला आहे. बुआ-बबुआ(मायावती- अखिलेश यादव) दोघे एकत्रित जितका काळ मुख्यमंत्री होते, त्यापेक्षा अधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री होतो. अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, स्वत:च्या जातीचा आश्रय क धीच घेतला नाही.