२०२४ साठी नव्या चेहऱ्यांना संधी; मंत्रिमंडळ विस्तारासोबत भाजपा संघटनेत होणार बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 09:40 PM2023-06-15T21:40:11+5:302023-06-15T21:40:55+5:30
पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.
नवी दिल्ली - पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली. पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल केले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू होती. जानेवारी महिन्यात विस्तार होईल बोलले गेले. त्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विस्ताराबाबत निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होती.
यानंतर १० जून ही नवीन तारीख आली. ही तारीखही निघून गेली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. पंतप्रधान याच आठवड्यात अमेरिकेला रवाना होत आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असताना भाजप देशभरात महिनाभर महासंपर्क अभियान राबवत आहे. ३१ मेपासून सुरू झालेला हा उपक्रम ३० जूनपर्यंत चालणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल
ज्यासाठी भाजपा एनडीएचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. तेलगू देसम पक्ष, जेडीएस, अकाली दल आणि हम सारख्या पक्षांशी सतत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर काही प्रादेशिक पक्षांसोबत युतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. २०१९ मध्ये मोदी पार्ट-२ सरकार स्थापन झाल्यापासून जुलै २०२१ मध्ये एकदाच फेरबदल झाला आहे. यानंतर १८ मे रोजी किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय घेण्यात आले. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघनाद यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तर मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन मोठे फेरबदल करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून काही लोकांना पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते. तसेच संघटनेतील अनेक बड्या चेहऱ्यांना डच्चू दिला जाईल असं निश्चित मानलं जात आहेत. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले की, कोण बाहेर आणि कोण आत हे फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोनच लोकांना हे माहित आहे, बाकी सर्व अंदाज वर्तवत आहेत.
पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. लोकसभेतील खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य द्यावे, असे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली आहे त्यांना काढलं जाणार नाही. गेल्या फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना वगळण्यात आले होते. जेडीयू एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर आरसीपी सिंह यांचीही जागा रिक्त आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल ही राज्ये भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांतील नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी बातमी आहे.