फिफा वर्ल्डकप ओळख निर्माण करण्याची आणि फुटबॉल खेळ प्रत्येक गावात पोहोचवण्याची संधी - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 11:45 AM2016-03-27T11:45:55+5:302016-03-27T12:11:58+5:30

पुढच्यावर्षी होणा-या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेमुळे संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण करण्याची एक चांगली संधी आहे.

Opportunity to create FIFA World Cup recognition and to deliver soccer games to every village - Prime Minister | फिफा वर्ल्डकप ओळख निर्माण करण्याची आणि फुटबॉल खेळ प्रत्येक गावात पोहोचवण्याची संधी - पंतप्रधान

फिफा वर्ल्डकप ओळख निर्माण करण्याची आणि फुटबॉल खेळ प्रत्येक गावात पोहोचवण्याची संधी - पंतप्रधान

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पुढच्यावर्षी होणा-या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेमुळे संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण करण्याची एक चांगली संधी आहे. आपण या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहोत. आधी फुटबॉलमध्ये भारताची कामगिरी चांगली होती पण आता फिफाच्या क्रमवारीत आपली घसरण झाली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले. 
 
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान 'मन की बात' कार्यक्रमाव्दारे देशवासियांना संबोधित करतात. यावेळी मोदींनी भारतात होणा-या अंडर -१७ फिफा वर्ल्डकपचे महत्व लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवणा-या टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या.  
 
फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने फुटबॉल देशाच्या प्रत्येक गावात, कानाकोप-यात आपण पोहोचवले पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला युवकांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करता येईल तसेच चांगले स्पोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचीही संधी आहे असे मोदी म्हणाले. 
 
शेतक-यांसाठी ही वेळ महत्वाची आहे. त्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पिकासाठी वापर करायचा आहे. आपणही पाणी वाचवण्याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी काम केले पाहिजे. शेतक-यांसाठी किसान सुविधा अॅप लॉंच केले असून, त्यावर शेतीसंबंधित सर्व माहिती आहे. शेतक-यांनी हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्यावे असे मोदींनी सांगितले. 
 
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सुट्टया वाया न घालवण्याचा सल्ला दिला. सुट्टयांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट तरी शिकून घ्या. ज्याने तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल असे मोदींनी सांगितले. 
 
मोदींच्या 'मन की बात' मधील मुद्दे
काही दिवसांपूर्वी टीबी डे होता, टीबी विरोधात लढण्यासाठी तुम्ही योग्य आणि पूर्ण उपचार घेतले पाहिजेत.
वाढत्या मधुमेहासाठी आपली बदलेली जीवनशैली मोठया प्रमाणात जबाबदार आहे.
७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आहे आणि हे वर्ष मधुमेह रोखणे आणि जागृतीसाठी आहे.
आपल्या शेतक-यांसाठी ही महत्वाची वेळ आहे, पाण्याची पातळी खाली गेली आहे आपण पाणी वाचवले पाहिजे .
तुम्ही डिजीटल इंडियाबद्दल ऐकले असेल, तुम्हाला आनंद होईल तुमच्यासाठी किसान सुविधा अॅप सुरु झाले आहे .
या सुट्टीत तुम्ही तुमच्या आवडीची एखादी नवीन गोष्ट शिका, त्याचे तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल .
माझ्या तरुण मित्रांनो सुट्टी अशीच वाया घालवू नका, या सुट्टीमध्ये एखादी नवीन गोष्ट शिका .
प्रवास आपल्याला भरपूर काही शिकवतो, जे आपण आपल्या घरात, वर्गात आणि मित्रांसोबत शिकू शकत नाही, प्रवासा दरम्यान आपल्याला शिकायला मिळते .
पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड संधी आहे, पण भारत या क्षेत्रात अन्य देशांपेक्षा मागे आहे .
भारत २०१७ मध्ये फिफा अंडर-१७ वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणार आहे, माझ्या दृष्टीने जागतिक स्तरावर भारताला चमकवण्याची ही एक चांगली संधी आहे, भारतातला प्रत्येक युवक या वर्ल्डकपसाठी दूत बनला तर, मला आनंद होईल . 
आमचे युवक फुटबॉलचा आनंद घेत आहेत, प्रत्येक गावापर्यंत फुटबॉल घेऊन जाणे आवश्यक आहे आणि फिफा अंडर-१७ एक चांगली संधी आहे.
भारताची फुटबॉलमध्ये आधी चांगली कामगिरी होती, पण आता फिफामध्ये आपल्या क्रमवारीत इतकी घसरण झाली आहे की, माझी बोलण्याचाही हिम्मत होत नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये बोलताना आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि बांगलादेशवरील विजयासाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या तसचे आजच्या सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Opportunity to create FIFA World Cup recognition and to deliver soccer games to every village - Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.