इस्रायल-भारत संबंध वृद्धिंगत होण्यास संधी- याकोव्ह फिन्केलस्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:43 AM2017-11-10T03:43:36+5:302017-11-10T03:43:40+5:30
भारत आणि इस्रायल यांना विविध क्षेत्रांमध्ये ज्ञानाची आणि सहकार्याची देवाणघेवाण करण्यास मोठी संधी आहे, असे प्रतिपादन इस्रायलचे मुंबईतील नवे महावाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टाईन यांनी केले.
मुंबई : भारत आणि इस्रायल यांना विविध क्षेत्रांमध्ये ज्ञानाची आणि सहकार्याची देवाणघेवाण करण्यास मोठी संधी आहे, असे प्रतिपादन इस्रायलचे मुंबईतील नवे महावाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टाईन यांनी केले. महावाणिज्यदूत म्हणून पदभार घेतल्यानंतर याकोव्ह यांनी लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.
इस्रायल-भारताचे संबंधांना दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. दोन्ही देशांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, सिंचन तसेच अनेक क्षेत्रांमध्ये आदानप्रदान होत आहे. इस्रायलसमोरही भारताप्रमाणे पाण्याचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे केवळ ठिबक सिंचनच नव्हे तर पाण्याचा पुनर्वापर आणि शुद्धीकरण याबाबतीतही एकत्रित काम करावे लागेल. इस्रायलद्वारे भारतात कृषीक्षेत्रात कार्य करण्यासाठी २६ केंद्रे उभी केली. त्यातील चार महाराष्ट्रात आहेत. शेतकºयांना उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञान व सिंचनपद्धतीचा उपयोग होऊ शकेल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नामध्येही या सहकार्याचा मोठा लाभ होईल, असे ते म्हणाले.
ठाणे शहर हे तेल अविव प्रमाणे डिजिटल बनवणे, सायबर, शिक्षण अशा अनेक प्रकल्पांमधून विविध समस्यांवर इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तर शोधता येऊ शकेल. इस्रायलचे उपग्रहही इस्रोने प्रक्षेपित केले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना आता ‘स्पेस इज द लिमिट’ असे म्हणावे लागेल.