‘टुर ऑफ ड्युटी ’अंतर्गत तरूणांना लष्करात संधी : ३ वर्ष करता येणार सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:29 PM2020-05-14T19:29:08+5:302020-05-14T19:40:29+5:30
लष्करात दाखल होण्याची तरूणांना सुवर्णसंधी
निनाद देशमुख-
पुणे : जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय लष्करात आता कमी कालावधीसाठी तरूणांना सेवा बजावता येणार आहे. ‘टुर ऑफ ड्युटी’ अंतर्गत ही संधी लष्कर देणार असून असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. भारतासाठी ही नवी संकल्पना असून सुरवातीला १०० अधिकारी आणि १००० जवांनांना ही संधी दिली जाणार आहे. त्यानंतर यात टप्या टप्याने वाढ केली जाणार असल्याची माहिती लष्कराचे प्रसिद्धी प्रमुख कर्नल अमन आनंद यांनी ‘लोकमत’ला दिली.
लष्करात अधिकारी दर्जाची अनेक पदे रिक्त आहेत. लष्करात तरूणांचे येण्याचे प्रमाण कमी आहे. भारतात मोठ्या प्रमाणात तरूण असून या तरूणांना संधी देण्यासाठी लष्करातर्फे ‘टुर ऑफ ड्युटी’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. ज्या तरूणांना लष्करात कायमस्वरूपी करिअर करायचे नाही, मात्र मानाची लष्करी सेवा बजावायची आहे, त्यांना तीन वर्षांच्या इंर्टनशिप कार्यक्रमाअंतर्गत लष्करात सेवा बजावता येणार आहे. लष्करात शार्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत १० वर्षापर्यंत लष्करात सेवा बजावता येते. या नंतर यात ४ वर्ष वाढ करता येऊ शकते. तरूणांना जास्तीत जास्त लष्कराकडे आकर्षित करण्यासाठी आता ३ वर्षापर्यंत संधी देण्यात येणार आहे. याचा लाभ लष्कराला होईल.
सुरूवातीला १०० अधिकारी आणि १००० जवानांना संधी मिळणार आहे. या साठी बजेटही राखून ठेवण्यात आले आहे. य् अधिकारी आणि जवानांच्या निवड प्रक्रियेत कुठलाही बदल राहणार नाही. आता ज्या पद्धतीने अधिकारी आणि जवानांना भरती करण्यात येते, त्याच पद्धतीने या निवडी केल्या जाणार आहेत. निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत काम सुरू आहे. 'टुर ऑफ ड्यूटी ' यशस्वी झाल्यास यात आणखी जागा वाढविल्या जातील असे, कर्नल अमन आनंद म्हणाले.
ज्या तरुणांना लष्करात दीर्घकाळ सेवा बजावायची नाही, मात्र लष्करात भरती व्हायचे आहे. किंवा ज्यांना लष्करात संधी मिळाली नाही अशांसाठी लष्करात दाखल होण्यासाठी हा नवा मार्ग राहणार आहे. या अंतर्गत दाखल झालेल्यांना सर्व प्रकारच्या 'ऑपरेशन्स'मध्ये सहभागी केले जाणार आहे. इतरांप्रमाणे त्यांना पगार मिळणार असला तरी पेन्शन योजना त्यांना लागु होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
----
लष्करात दाखल होण्याची तरूणांना सुवर्णसंधी
वयाच्या २८ वर्षापर्यंत तरूणांना लष्करात भरती होता येते. भारतात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), राष्ट्रीय रक्षा अकादमी (आयएमए), आफिसर्स ट्रेनिंग सेंटर (ओटीए) या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. तर जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी महू येथे ट्रेनिंग सेंटर आहे. काही तरूणांना या तिन्हीसाठी प्रयत्न करूनही अनेक कारणांनी संधी मिळत नाही. मात्र, टुर ऑफ ड्युटी अंतर्गत देशातील तरूणांना लष्करात दाखल होण्याची सुवर्णसंधी आहे. ज्यांना कायमस्वरूपी लष्करात दाखल व्हायचे नाही त्यांना कमी कालावधीसाठी या अंतर्गत लष्करात सेवा बजावता येणार आहे. लष्करालाही यामुळे चांगल्या दर्जाचे अधिकारी आणि जवान मिळतील. तिन वर्ष सेवा बजावल्यानंतर इच्छा असल्यास त्यांना पुढेही लष्कारात सेवा बजावता येऊ शकते.
...................
देशातील तरूणांना लष्करात भरती होण्यासाठी तसेच लष्कराला चांगल्या दर्जाचे अधिकारी मिळावे या हेतूने लष्करातर्फे 'टुर ऑफ ड्युटी' अंतर्गत तीन वर्ष सेवा बजावता येणार आहे. याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर याची अंमलबजावणी केली जाईल.
- कर्नल अमन आनंद, प्रसिद्धी प्रमुख, भारतीय लष्कर
........................
लष्कराने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तरूण, तरूणी लष्करात दाखल होतील. तीन वर्षांचा करार संपल्यावर त्यांना वाटल्यास ते पुन्हा लष्करात राहू शकतील. लष्कराचा अनुभव त्यांना संपन्न बनवेल. याचा चांगला परिणाम समाजवरही दिसून येईल. त्यामुळे या निर्णयाकडे सकारात्मक दुष्टीने पाहणे गरजेचे आहे. - लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)