लिपुलेखच्या भारतविरोधी नकाशाला संसदेत विरोध केला; नेपाळमध्ये खासदाराच्या घरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:06 PM2020-06-11T12:06:18+5:302020-06-11T12:09:14+5:30
बुधवारी संसदेमध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारतीय सैन्यावर नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता.
काठमांडू : चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. हा नकाशा नेपाळी संसदेमध्ये मान्यतेसाठी मांडण्यात आला आहे. यास विरोध दर्शविणाऱ्या महिला खासदाराच्या घरावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नेपाळमधील जनता समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गीरी यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी गीरी यांच्या घरावर काळा झेंडा लावला आहे तसेच देश सोडण्याची धमकी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गीरी यांनी पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली मात्र, त्यांना कोणतीही मदत, संरक्षण देण्यात आले नाही.
एवढेच नाही तर जनता समाजवादी पक्षानेही गीरी यांच्यापासून अंतर राखले आहे. सरिता गीरी यांनी हा नकाशा नामंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी संविधान दुरुस्ती प्रस्तावावर आपला वेगळा दुरुस्ती प्रस्ताव मांडला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाने गीरी यांना हा प्रस्ताव मागे घेण्याची सूचना केली आहे. नेपाळ सरकारकडे नवीन नकाशासाठी पुरेसे पुरावे नाहीत, यामुळे देशाच्या नकाशामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी गीरी यांनी केली होती.
भारतीय सैन्याने नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप
बुधवारी संसदेमध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारतीय सैन्यावर नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की, कालापानी क्षेत्रामध्ये भारताने त्यांचे सैन्य तैनात केले आहे. हे अतिक्रमण आहे. भारताने तिथे काली मंदिर बांधले आणि कालापानीवर दावा सांगण्यासाठी कृत्रिमरित्या काली नदी निर्माण केली.
ओली यांनी सांगितले की, नेपाळ सरकार लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला प्राथमिकता देत आहे. कारण या भागात आंतरराष्ट्रीय़ सीमेच्या अन्य़ भागात या प्रकारे कब्जा करण्यात आलेला नाही. सीमा वादाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरले आहे. आदित्यनाथांनी नेपाळवर केलेले वक्तव्य निंदनिय आहे. आदित्यनाथ जर नेपालला घाबरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते योग्य नाहीय.
काय आहे नेपाळसोबतचा वाद?
भा रताने आपल्या हद्दीत कालपानी ते लिपुलेखपर्यंत रस्ता तयार केल्याने नेपाळ चांगलेच भडकले. या वादाची कारणमीमांसा करताना इतिहासाची पाने दोनशे वर्षे मागे उलटून पाहिली असता एक विशेष करार (तह) असल्याचे दिसते. नेपाळ ज्या भू-भागावर दावा करतो, तो भाग संस्थानिकांच्या काळात युद्धात नेपाळने जरूर जिंकला होता; परंतु इंग्रजांशी झालेल्या लढाईनंतर सुगौली करारातहत पूर्ण जमीन परत करावी लागली होती. भारताचा भू-भाग भारताच्या हिश्श्याला आला होता.
भीमसेन थापा नेपाळचे सर्वेसर्वा असतांना १८०६ च्या आसपासची ही कथा. गिर्वाणयुद्ध विक्रम शहा त्यावेळी राजे होते. त्यांचे वय ९ वर्षे असावे. १७९७ मध्ये त्यांचा जन्म झाला. दोन वर्षे वय असताना त्यांना १७९९ मध्ये नेपाळ नरेश करण्यात आले होते. ते अल्पवयीन असल्याने कारभार भीमसेन थापा चालवायचे. नंतर ते पंतप्रधान झाले. तेव्हा भारत विविध संस्थानांत विभागलेला होता. याचा फायदा घेत थापाने एकापाठोपाठ आक्रमण करीत आजचे हिमाचल आणि उत्तराखंडचा मोठा भाग जिंकला. कांगडा किल्ल्यापर्यंत नेपाळचे राज्य पसरले होते. गोरखांच्या बहादुरीपुढे भारतीय संस्थानिकांची फौज तग धरूशकली नाही. एवढेच नव्हे, सिक्कीमचा मोठा भागही नेपाळच्या कब्जात गेला. इंग्रजांनी युद्धासाठी कारण शोधले.
अवध इंग्रजासोबत आलेले होते आणि नेपाळसोबत सीमावाद चालू होता. त्यातूनच १ नोव्हेंबर १८१४ रोजी नेपाळ अािण ब्रिटिशांदरम्यान युद्ध सुरू झाले. १८१५ उजाडेपर्यंत गोरखा सैनिक पराभवाच्या उंबरठ्यावर आले.४ मार्च १८१६ ला दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे सुगौली गावात तह (करार) झाला, तीच युद्धसमाप्तीची तारीख मानतात. नेपाळतर्फे राजगुरू गजराज मिश्र आणि ईस्ट इंडिया कंपनीतर्फे लेफ्ट. कर्नल ब्रॅडशॉ यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानंतर नेपाळला २५ वर्षांत जिंकलेला भाग ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा लागला. तराई म्हणजे अवधच्या हिश्श्यातील काही भाग करारानंतर काही दिवसांनी नेपाळला परत करण्यात आला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु सुगौली करार कायम राहिला. ज्या रस्त्यावरून वाद आहे, तो भाग भारताचा आहे. मोघम सीमामुळे नेपाळकडून संभ्रम निर्माण केला जातो.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा
उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी
Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक
CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे
भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे