राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांवर विराेधकांचे विचारमंथन सुरू; गुलाम नबी, यशवंत सिन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:05 AM2022-06-15T06:05:26+5:302022-06-15T11:42:49+5:30

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत उतरण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इच्छा नसल्याने विरोधी पक्ष विश्वासार्ह आणि वरिष्ठ नेत्याचा शोधात आहे.

Opposition begins debating presidential candidates Ghulam Nabi Yashwant Sinha name in discussion | राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांवर विराेधकांचे विचारमंथन सुरू; गुलाम नबी, यशवंत सिन्हा चर्चेत

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांवर विराेधकांचे विचारमंथन सुरू; गुलाम नबी, यशवंत सिन्हा चर्चेत

Next

हरीश गुप्ता/सुरेश भुसारी

नवी दिल्ली :

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत उतरण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इच्छा नसल्याने विरोधी पक्ष विश्वासार्ह आणि वरिष्ठ नेत्याचा शोधात आहे. विराेधकांचे उमेदवार निवडीसाठी मंथन सुरू झाले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पोहोचताच शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बाेलाविलेल्या विराेधकांच्या संयुक्त बैठकीपूर्वी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

सूत्रांनुसार शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे नाव सुचविले आहे. गुलाम नबी आझाद हे वादातीत आणि मनमिळाऊ व्यक्ती असून, त्यांच्या नावाबाबत विराेधकांमध्ये एकमत होऊ शकते. काँग्रेसचे त्यांच्या बाबतीत आक्षेप असू शकतात, असे वृत्त आहे. परंतु, शरद पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रानुसार काँग्रेसचा त्यांना विरोध नाही. 

एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, विरोधी पक्षांच्या गोटात राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभावान व्यक्तीची उणीव आहे. पवार हे इच्छुक नसल्याने आमची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला आव्हान देऊ शकणाऱ्या योग्य उमेदवार शोधण्यासाठी धडपड चालू आहे.

बसप नेत्या मायावती आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिलेला आहे. प्रकृतीमुळे मुलायमसिंह यादव आणि शरद यादव यांना या घडीला कोणतीही महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता नाही. दरम्यान, राज्यसभेचे अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनी विरोधी पक्षांची इच्छा असल्यास उमेदवार होण्याची तयारी दाखविली आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची आज, बुधवारी दुपारी बैठक आयोजित केली आहे. यात प्रामुख्याने विरोधकांतर्फे कोण उमेदवार राहील, यावरच चर्चा होण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेस व बीजेडीचे नेते वगळता इतर विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. जवळपास २२ पक्षांचे नेते या बैठकीला हजेरी लावतील. 

ममतांनी सुचविले सिन्हांचे नाव
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा (वय ८४) यांचे नाव सूचित केले आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. परंतु, सर्व पक्षांत त्यांची स्वीकारार्हता निर्विवाद आहे. तथापि, वय आणि जात बघता प्रतिकूल मत असू शकते.
- डाव्या पक्षांनी सध्या तरी कोणाचेही नाव सुचविलेले नाही. परंतु, डावे पक्ष महात्मा गांधी यांचे नातू गोपाल कृष्ण गांधी यांना पसंती देतील. इतर नेत्यांचीही पवारांसाेबत चर्चा

शरद पवार यांचे सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असल्याने उमेदवारांवर एकमत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी यापूर्वी पवारांशी चर्चा केली आहे. डाव्या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांची आजच भेट घेतली. डाव्या पक्षांच्या नेत्यांचा कल काय आहे यावर या दोन्ही नेत्यांची बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Opposition begins debating presidential candidates Ghulam Nabi Yashwant Sinha name in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.