मुगलसरायचे नाव बदलण्यास विरोध, सरकारच्या प्रस्तावावरून राज्यसभेत सपा, बसपाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:39 AM2017-08-05T00:39:59+5:302017-08-05T00:40:03+5:30
उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरुन शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ झाला.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरुन शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ झाला. समाजवादी पार्टी आणि बसपाच्या सदस्यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारत आक्रमक रूप धारण केल्याने गोंधळातच कामकाज स्थगित करण्यात आले. या विषयावरील चर्चा थांबवण्यास उपसभापतींनी काँग्रेसच्या छाया वर्मा यांचे नाव पुकारताच, वर्मा यांनी छत्तीसगडमधील मंत्र्याच्या पत्नीच्या जमीन हडपण्याचा विषय उपस्थित केला. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सपाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोर येत घोषणाबाजी केली. सपाचे नरेश अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हे रेल्वे स्टेशन १८६२ मध्ये अस्तित्वात आले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने हावडा ते दिल्ली हा मार्ग रेल्वेने जोडला होता.
रेल्वेने या स्टेशनचे नाव दीनदयाळ उपाध्याय करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. अग्रवाल म्हणाले की, सरकार देशाचे चरित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे अन्य सदस्य म्हणाले की, ज्यांचे स्वातंत्र्याच्या संघर्षात कोणतेही योगदान नाही
त्यांचे नाव रेल्वे स्टेशनला दिले जात आहे. त्यास उत्तर देताना मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, एका विचारवंताचे नाव देण्यास विरोध करणे अयोग्य आहे. मुगलांचे नाव बदलण्यास तुम्ही निष्कारण विरोध करीत आहात.