काँग्रेसशी आघाडीवरून माकपमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:16 AM2019-02-26T06:16:59+5:302019-02-26T06:17:01+5:30
बंगालमध्ये चर्चा : केरळमध्ये जोरदार विरोध
तिरूवनंतपूरम : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, आमची देशात कुठेही काँग्रेसशी आघाडी होणार नाही, अशी भूमिका केरळमधील माकपच्या नेत्यांनी घेतली आहे. मात्र जागावाटप आणि आघाडी यांच्यात फरक आहे. त्यामुळे आघाडी होणार नसली तरी काही राज्यांमध्ये एकमेकांसाठी हे दोन पक्ष जागा सोडतील, असे दिसत आहे.
मार्क्सवाद्यांचा एके काळी प. बंगाल हा बालेकिल्ला होता. सलग ३४ वर्षे त्यांचीच सत्ता होती. पण सत्ता गेली आणि तेथील माकप व सारेच डावे पक्ष खिळखिळे झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलविरोधात लढण्यास आपण काँग्रेसशी समझोता करायला हवा, असे माकप नेत्यांना वाटते. काँग्रेसलाही ताकद वाढवायची असून, त्यासाठी तेथील नेते आता माकपशी समझोता करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी चर्चाही सुरू आहे. पण केरळमध्ये काँग्रेसच्या हातातील सत्ता मार्क्सवाद्यांनी खेचून घेतली. तिथे काँग्रेसशी अजिबात आघाडी करू नये, असे माकप नेत्यांचे म्हणणे आहे. माकपचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी तर केरळात काय, संपूर्ण भारतातच काँग्रेसशी आघाडी करणार नाही, असे सोमवारी जाहीर केले. बालकृष्णन हे माकपच्या पॉलिट ब्युरोचे ज्येष्ठ सदस्य आहेत. प. बंगालमध्ये काँग्रेसशी सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेलाही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
सबरीमाला मंदिरप्रकरणी काँग्रेसने भाजपासारखी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने माकप व डावे पक्ष नाराज आहेत. केरळमध्ये काँग्रेस व माकप यांचे कधीही पटले नाही. त्यामुळे राज्यात कधी काँग्रेसप्रणित युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे तर कधी माकपच्या लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटचे सरकार असते. कार्यकर्त्यांमध्ये सतत हाणामाऱ्या होत असतात आणि प्रसंगी एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या हत्याही होतात. त्यामुळे केरळातील माकपच काय, पण काँग्रेसलाही अशी आघाडी वा समझोता नको आहे.
येचुरी काय म्हणतात
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे मात्र काही राज्यांत समविचारी पक्षांशी समझोता करायला हवा, अशा मताचे आहे. भाजपाला पराभूत करायचे असेल, तर असे जागावाटप आवश्यक आहे, असे त्यांनी बोलून दाखविले होते.