विराेधक एकवटले; एकच उमेदवार देणार, राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांनी दर्शविला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:34 AM2022-06-16T05:34:07+5:302022-06-16T05:34:22+5:30
देशातील लोकशाही व सामाजिक वीण उसवणाऱ्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना लगाम घालण्यासाठी एकच उमेदवार
सुरेश भुसारी
नवी दिल्ली :
देशातील लोकशाही व सामाजिक वीण उसवणाऱ्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना लगाम घालण्यासाठी एकच उमेदवार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय बुधवारी विरोधकांच्या बैठकीत घेण्यात आला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने २२ पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. १६ पक्षांचे नेते येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जमले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक पावणेदोन तास चालली. पवार यांच्या उमेदवारीवर सर्वांनी एकमत दर्शवले. मात्र, पवार यांनी याला नम्र नकार दिला. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झालेली नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या नावावर विचार करण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून २१ जून रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी पुढील बैठक होईल, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
ठराव संमत
बैठकीत संमत झालेला ठराव राष्ट्र मंचचे सुधींद्र कुलकर्णी यांनी वाचून दाखविला. मोदी यांच्या नेतृत्वात असलेले सरकार लोकशाही व सामाजिक वीण उद्धवस्त करीत आहे. त्यामुळे लोकशाहीचा प्रहरी असणारा उमेदवार राष्ट्रपतिपदी असावा, असा विचार करून सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे या ठरावात म्हटले आहे.
‘गैरहजर पक्षही येतील’
बैठकीला काही अडचणींमुळे काही पक्ष येऊ शकले नाही. त्यांच्याशी चर्चा केली. पुढील बैठकीत ते सर्व पक्षही हजर राहतील, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. लोकशाहीला तुडविणाऱ्या शक्तीचा धोका लक्षात घेऊन विरोधी पक्ष एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसहमतीसाठी भाजपचे प्रयत्न
- या निवडणुकीसाठी सर्व सहमतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा आहे.
- भाजपाचे नेते राजनाथ सिंह हे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करत आहेत.
- राजनाथ सिंह यांनी बीजेडीचे नवीन पटनायक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपाच्या प्रमुख मायावती आणि जदयूचे नितीशकुमार यांच्याशीही संवाद साधला आहे.
- एनडीएचा संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत विरोधकांनी राजनाथ सिंह यांना विचारणा केल्याचे समजते.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून विरोधी पक्षांनी माझ्या नावाची शिफारस केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु या प्रस्तावाला मी नम्रपणे नकार देत आहे. जनसेवेचे माझे व्रत यापुढेही सुरूच राहील.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.