दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत गाजणार; राज्यसभेत विरोधकांची चर्चेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:57 PM2020-03-02T12:57:48+5:302020-03-02T13:00:02+5:30
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी देखील दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत आक्रमकपणे मांडू असं म्हटले होते. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्लीतील हिंसेवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या धार्मिक हिंसेचा मुद्दा सोमवारपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात आक्रमकपणे मांडण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू यांना राज्यसभेची कार्यवाही स्थगित करून दिल्ली हिसेंची चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
या मुद्दावर माकपचे के.के. रागेश, टीके रंगराजन आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी 267 नियमानुसार कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली आहे. बजेट सत्राचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत चालल्यानंतर दुसरा टप्पा 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. रागेश यांच्याद्वारे राज्यसभा सचिवालयाला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये सोमवारी सभागृहाचे कामकाज स्थगित करून दिल्लीतील हिसेंवर चर्चा करण्याची मागणी सभापतींकडे करण्यात आली आहे.
दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत 42 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा जनहिताचा विषय असून तीन्ही सदस्यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी देखील दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत आक्रमकपणे मांडू असं म्हटले होते. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्लीतील हिंसेवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.