विरोध सरकारच्या सूडबुद्धीला -काँग्रेस
By admin | Published: December 9, 2015 11:22 PM2015-12-09T23:22:56+5:302015-12-09T23:22:56+5:30
नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेस आणि भाजपत चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेस आणि भाजपत चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात नाही तर विरोधकांबाबत सरकार दाखवीत असलेल्या सूडबुध्दीच्या विरोधात आहे, हे स्पष्ट करताना सभागृहातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. या आक्षेपाचे खंडन करताना, काँग्रेस संसदेच्या माध्यमातून न्यायलयावर दबाव आणू पाहात असल्याची टीका संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.
संसदेतून काँग्रेसचा न्यायालयांवर दबाव
या आक्षेपांचे खंडन करतांना संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, काँग्रेसचा खरा आक्षेप नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाच्या निकालावर आहे. संसदेच्या सभागृहांचा वापर करून न्यायालयांवर ते दबाव निर्माण करू इच्छितात. काँग्रेस सत्तेवर असतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तुरूंगात डांबण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना सीबीआय व अन्य यंत्रणांमार्फत मोदींची अनेक तास चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही संसदेला भाजपने कधी वेठीला धरले नाही. उलट काँग्रेसच्या ३0 लोकांनी लोकसभेत दुष्काळावर सुरू असलेली चर्चा गोंधळ घालून हाणून पाडली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)