माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:45 PM2024-09-16T19:45:55+5:302024-09-16T19:46:42+5:30
"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा हिशेब जनते समोर मांडला. यावेळी ते म्हणाले, या काळात आपली प्रचंड खिल्ली उडवली गेली, चेष्टा केली गेली, अपमानित केले गेले. मात्र आपण लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत होतो. यामुळे सर्व काही शांतपणे सहन करत होतो. ते अहमदाबादमध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले, देशातील जनतेने 60 वर्षांनंतर एक नवा इतिहास रचला आहे. एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही भारताच्या लोकशाहीतील एक मोठी घटना आहे. मी निवडणूक काळात देशातील जनतेला गॅरंटी दिली होती की, सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यात येतील. गेल्या 100 दिवसांत मी दिवस, रात्र बघितली नाही. 100 दिवसांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली. देशात असो वा परदेशात जेथे जे प्रयत्न करायचे होते, ते केले. कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.
विरोधकांवर आपली खिल्ली उडवल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, "गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण, माझ्या गुजराती बंधू-भगिनींनो हा सरदार पटेलांच्या भूमीत जन्माला आलेला मुलगा आहे. सर्व प्रकारच्या खिल्ल्या आणि अपमान सहन करत, एक प्रण करत 100 दिवसांत आपल्या कल्याणासाठी धोरणे बनवण्यात आणि तुमच्या कल्याणाचे निर्णय घेण्यात व्यस्त राहिलो. ज्यांना ज्या पद्धतीने खिल्ली उडवायची आहे, उडवा. त्यांना पण तर आनंद वाटावा. घ्या... मी कसल्याही प्रकारचे उत्तर द्यायचे नाही, हे निश्चित केले होते."
मोदी म्हणाले, "या 100 दिवसांत 15 लाख कोटींहून अधिक योजनांवर काम सुरू झाले आहे. ३ कोटी कुटुंबांना घरे देण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू आहे. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची हमी पूर्ण करण्यात आली आहे. या 100 दिवसांत तरुणांच्या रोजगारासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे विशेष पीएम पॅकेज जाहीर करण्यात आले. याचा फायदा 4 कोटींहून अधिक तरुणांना होणार आहे. आता कंपनीत पहिल्या नोकरीची पहिली सॅलरीही सरकार देईल. तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत गुजरातसह संपूर्ण देशात 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत."