ईशान्येतील राज्यात वाढतोय नागरिकत्व विधेयकाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:55 AM2019-01-25T05:55:12+5:302019-01-25T05:55:58+5:30
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विरोध वाढत चालला असून, अनेक संघटना रस्त्यावर उतरू लागल्या आहेत.
इम्फाळ : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विरोध वाढत चालला असून, अनेक संघटना रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. हा विरोध लक्षात घेऊ न या विधेयकावर चर्चा करण्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी २९ जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या राज्यात भाजपप्रणीत आघाडी सरकारमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रन्ट, लोक जनशक्ती पार्टी या पक्षांचाही समावेश आहे. हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यात मणिपूर पीपल्स पार्टी (एमपीपी) व सहा विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने निदर्शने सुरू आहेत. हा कायदा लागू करू नका, अशी मागणी मणिपूर सरकारने केंद्राकडे केली आहे. या विधेयकाच्या विरोधात आसाम गण परिषदेने गुरुवारी १० तासांचे उपोषण केले, तर काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यांत पाच तास धरणे धरले होते. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या दोन्ही पक्षांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)