'दोनवेळा पंतप्रधान झालात आणखी काय हवं?, मी म्हटलं...', मोदींना भेटलेला 'तो' मोठा नेता कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:10 AM2022-05-13T09:10:54+5:302022-05-13T13:17:00+5:30
"एक दिवस एक ज्येष्ठ नेते मला भेटायला आले. ते नियमितपणे आमचा राजकीय विरोध करत आले आहेत, पण मी त्यांचा आदर करतो"
भरुच-
देशाचं दोनवेळा पंतप्रधान होणं ही उपलब्धी पुरेशी आहे. आता आणखी काय हवंय असं विरोधी पक्षातील नेत्यानं व्यक्त केलेल्या मताचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी अजिबात थांबणार नसून यापुढेही देशासाठी अविरत काम सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.
विधवा, वृद्ध आणि निराधार नागरिकांसाठी गुजरात सरकारच्या आर्थिक सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यासोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला.
"एक दिवस एक ज्येष्ठ नेते मला भेटायला आले. ते नियमितपणे आमचा राजकीय विरोध करत आले आहेत, पण मी त्यांचा आदर करतो. ते काही मुद्द्यांवर आमच्याशी सहमत नव्हते. म्हणून त्यांनी माझी भेट घेतली. ते मला म्हणाले देशानं तुम्हाला दोनवेळा पंतप्रधान केलं. आता तुम्हाला आणखी काय हवं? देशाचं दोनवेळा पंतप्रधान झालात म्हणजे तुम्ही सर्व आयुष्यात सर्व साध्य केलं आहे असं त्याचं म्हणणं होतं", असं नरेंद्र मोदी म्हणाले.
"त्यांना माहित नाही मोदी म्हणजे काय आहे. गुजरातच्या भूमीत मी घडलेलो आहे. कोणतीही गोष्ट सहजतेनं घेण्यावर मी विश्वास ठेवत नाही. जे घडलं ते घडलं आणि आता सगळं करुन झालं. आता आराम करायचं. असं अजिबात नाही. लोकहिताच्या योजना १०० टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतच राहणार", असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या या किस्स्यामधील तो मोठा नेता कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. मोदींनी केलेल्या भाषणात त्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई संदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. मोदींच्या भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देखील प्रसार माध्यमांना त्यावेळी दिली होती.