वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:41 PM2024-10-28T17:41:10+5:302024-10-28T17:42:21+5:30

JPC Meeting: गेल्या बैठकीत भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये बाचाबाची झाली होती.

Opposition MPs walked out from the JPC meeting on the Waqf Amendment Bill | वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट

वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट


JPC Meeting : केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ उडाला. यापूर्वीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडल्याची घटना घडली होती. तर, यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा विरोध करत सभात्याग केला. सभेत ज्या प्रेझेंटेशनवर चर्चा सुरू होती, ती बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

प्रेझेंटेशनमध्ये बदल केला
समितीसमोर हजर झालेल्या दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) आयुक्त आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक अश्विनी कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय वक्फ बोर्डाच्या सादरीकरणात बदल केल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, द्रमुकचे खासदार मोहम्मद अब्दुल्ला, काँग्रेसचे नसीर हुसेन आणि मोहम्मद जावेद यांच्यासह इतर विरोधी सदस्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. 

29 ऑक्टोबर रोजी पुढील बैठक
जेपीसीने वक्फ दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली वक्फ बोर्ड, हरियाणा वक्फ बोर्ड, पंजाब वक्फ बोर्ड, उत्तराखंड वक्फ बोर्ड, कॉल फॉर जस्टिस आणि वक्फ टेनंट्स वेल्फेअर असोसिएशन, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या गटाला बोलावले होते. या बैठकीत पुन्हा एकदा गदारोळ झाला. मात्र, सभात्याग करून सर्व खासदार काही वेळातच पुन्हा बैठकीत सामील झाले. आता जेपीसीची पुढील बैठकही 29 ऑक्टोबरला होणार आहे.

कल्याण बॅनर्जी यांनी बाटली फोडली
जेपीसीच्या मागील बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये हाणामारी झाली. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी जखमीही झाले. रिपोर्ट्सनुसार, कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची बाटली उचलून टेबलावर मारली होती, त्यामुळे ते जखमी झाले. यानंतर कल्याण बॅनर्जी यांना समितीमधून निलंबित करण्यात आले.

Web Title: Opposition MPs walked out from the JPC meeting on the Waqf Amendment Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.