विरोधी पक्षांच्या विस्कळीत आघाडीचा मोदींनाच फायदा, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:39 AM2018-11-05T05:39:30+5:302018-11-05T05:39:53+5:30
नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
ते म्हणाले की, मोदीविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या हेतूने विविध पक्षांतील १४ ते १६ पक्षनेते एका व्यासपीठावर येतात. पण या प्रयत्नांमागे ठोस धोरण नाही. ही महायुती होईल की नाही याबाबतही निश्चिती नाही. उत्तर प्रदेशात मायावती विरोधी पक्षांना सहकार्य करणार का? आघाडी स्थापन करण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांचे प्रयत्न फलद्रूप होतील का अशा अनेक शंका लोकांच्या मनात
आहेत. मोदींच्या विरोधात एकजुटीने उभे राहिल्यास विरोधी पक्षांना फायदा होईल. (वृत्तसंस्था)\
एकत्र येणार नाही
भाजपच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये बसपा व समाजवादी पक्ष युती करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीची युती होईल का या प्रश्नावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी हे परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले पक्ष आहेत.
आमची युती झाल्यास दोघांनाही राजकीय नुकसान सोसावे लागेल. आम्हाला भाजपचे भय वाटत नाही असेही ते म्हणाले.