मुस्लिमांचे प्रश्न टाळणे विरोधी पक्षांना महागात पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:23 AM2019-05-26T05:23:25+5:302019-05-26T05:23:27+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला.
- अॅड. फिरदोस मिर्झा (सामाजिक कार्यकर्ते)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला. या अपयशासाठी त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. मुस्लीम समाजाकरिता ही निवडणूक फार विचित्र होती. त्यांना या निवडणुकीत मुद्दाम रस नव्हता. त्यामागे विविध कारणे होती. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी गेली पाच वर्षे सतत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांवर सामूहिक हल्ले केले.
गोरक्षणाच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार केले. तिहेरी तलाकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यात आला. अशा गंभीर घटना घडत असताना विरोधातील एकाही पक्षाने आवाज उठवला नाही.
दुसºया बाजूने सत्ताधाऱ्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तसेच, या निवडणुकीत एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुस्लीम समाजाच्या विकासाचा मुद्दा नव्हता. सर्वत्र केवळ मुस्लीमविरोधी वातावरण होते. या निवडणुकीत मुस्लिमांना भाजपने फक्त ७ तर, काँग्रेसने २४ तिकिटे दिली. परंतु, त्यांना निवडून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.
याउलट प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी वायनाडमधून काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज विजयी झाले
होते.
या वेळी त्या जागेवर राहुल गांधी उभे राहिले. तसेच, बिहारमध्ये जिंकण्याची ताकद असणारे शकील अहमद यांचे तिकीट काँग्रेसने कापले. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांमध्ये मुस्लिमांचा समावेश नव्हता. त्यांना प्रचारात उतरविण्याचे प्रयत्नदेखील झाले
नाहीत.
परिणामी, या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि निकालाचे अवलोकन केल्यास विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्याचे दिसते.
या निकालाचा मुस्लीम समाजावर विविध बाबतीत प्रभाव पडेल. ते आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर उभे होण्याचा प्रयत्न करतील. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतील. तसेच, विशिष्ट गटाने जाणीवपूर्वक खराब केलेली प्रतिमा सुधारतील.या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्या.