विराेधक आयाेगाला विचारणार ईव्हीएमच्या दुरुपयाेगाबाबत जाब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 06:37 AM2023-03-24T06:37:32+5:302023-03-24T06:38:06+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यावर सहमती झाली.
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या दुरुपयोगासंबंधांतील सर्व प्रकारच्या शंका-कुशंकांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यावर सहमती झाली.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेसंबंधातील सर्व आक्षेपांचे लेखी निराकरण करावे. प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला. शरद पवार यांच्या ६, जनपथ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे खा. दिग्विजय सिंह, ज्येष्ठ विधिज्ञ खा. कपिल सिब्बल, ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे प्रा. रामगोपाल यादव, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.