मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट
By admin | Published: November 14, 2016 07:10 PM2016-11-14T19:10:22+5:302016-11-14T19:10:22+5:30
नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासावरून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासावरून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला संसदेत घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, आरजेडी, जेडीयू आणि अन्य पक्ष सहभागी झाले. आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी या पक्षांनी मंगवळवारी अजून एका बैठकीचे आयोजन केले आहे.
बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच दिवशी विरोधी पक्षांच्या 100 खासदारांना घेऊन नोटबंदीविरोधात संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच विरोधी पक्ष बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची मागणी करू शकतात.
दरम्यान, सोमवारी दिल्लीत एकाच वेळी काँग्रेस, आप आणि बसपा या तीन पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच भडिमार केला. यावेळी नोटबंदीबाबत भाजपाला आधीपासून माहिती होती, अशी शंका काँग्रेसने पुन्हा उपस्थित केली. मायावती आणि अरविंद केजरीवाल यांनीही पत्रकार परिषदेतून मोदींवर सडकून टीका केली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 50 दिवस त्रास सहन करण्याच्या मोदींनी केलेल्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे.
दुसरीकडे तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सगळ्या भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ममता बॅनर्जींनी सीताराम येचुरी यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, डाव्या पक्षांनीही नरेंद्र मोदींची काळ्या पैशाविरोधातील कारवाई हा केवळ देखावा असल्याची टीका केली आहे.
#WATCH Congress, TMC, RJD, JD(U),JMM, CPI, CPI(M) and other opposition parties hold meeting ahead of Parliament winter session pic.twitter.com/RF11sl2jzV
— ANI (@ANI_news) 14 November 2016