म्हणून एक्झिट पोलमुळे अस्वस्थ विरोधी पक्षांना ऑस्ट्रेलियातील निकालांमधून दिसतोय आशेचा किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:14 PM2019-05-20T16:14:06+5:302019-05-20T16:14:44+5:30
एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची झोप उडवली आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए भरभक्कम संख्याबळासह सत्तेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणूक नुकतीच पार पडली. तेथील मतदान प्रक्रिया आटोपल्यावर तेथील वृत्तसंस्थांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. त्यापैकी बहुतांश एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षात असलेल्या लेबर पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. मात्र सत्ताधारी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील कंझर्वेटिव्ह पक्षाने दणदणीत विजय मिळवत एक्झिट पोलनी वर्तवलेला अंदाज खोटा ठरवला होता.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या प्रतिनिधी सभेत मॉरिसन यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला 74 तर विरोधी लेबर पक्षाला 66 जागा मिळाल्या. प्रतिनिधी सभेमध्ये बहुमतासाठी 76 जागांची गरज असते. त्यामुळे आता 51 मॉरिसन यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. दरम्यान त्रिशंकू सभागृहाच्या परिस्थितीत आपण आघाडी करून काम करू असे अपक्ष खासदार हेलन हेन्स यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात उद्भवलेल्या याच परिस्थितीचा आधार घेत विरोधी पक्षांचे नेते 23 मे पर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरून चमत्कारिक निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांना आहे.