अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:00 AM2019-03-29T10:00:01+5:302019-03-29T10:00:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. अभिनंदन आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बनवण्याचा डाव विरोधकांनी आखला होता. मात्र अभिनंदनच्या सुटकेची घोषणा झाल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले, असा दावा मोदींनी केला आहे.
रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा धोशा सुरू केला. त्या रात्री मेणबत्ती मोर्चा आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.''
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याच सल्ला दिला. ''पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडावा अशी भारताची मागणी आहे. इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे. तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींनाही पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे,'' अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
'' यापूर्वी जनता मोदीला ओळखत नव्हती. मात्र आता देश मोदीला ओळखतो. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नांवर देशाला माझी भूमिका माहिती आहे. त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती माझ्या देशभक्तीवर शंका घेत नाही. हे माझे शब्द नाही. तर माझे जीवन बोलते,'' असेही मोदींनी यावेळी सांगितले.
यावेळी डीआरडीओने परवाच घेतलेल्या उपग्रहविरोधी मिशन शक्तीवरूनही मोदींनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, A-SAT बाबत काँग्रेसकडे सामान्य ज्ञानाचा अभाव आहे. A-SAT ची चाचणी घेण्यापूर्वी दीर्घ योजना आखली गेली होती. निवडणुकीच्या काळात सरकार गंभीर प्रश्नांबाबत बोलू शकत नाही का? सध्या विरोधी पक्षांना अज्ञानाने घेरले आहे. 30 वर्षांच्या अस्थिरतेनंतर देशाला आता स्थिरता हवी आहे.''