विरोधकांच्या पहिल्याच एकता बैठकीवर ‘अनुपस्थित’चे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:18 AM2023-06-02T06:18:21+5:302023-06-02T06:19:32+5:30
काँग्रेस नेत्यांसह स्टॅलिन, सीताराम येचुरी यांची असमर्थता. तर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे बैठकीला जाण्याचे संकेत राऊत यांचे आहेत.
आदेश रावल
नवी दिल्ली : पाटण्यात १२ जून रोजी होणारी विरोधी पक्षांची बैठक प्रभावहीन होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होण्यात असमर्थता व्यक्त केली आहे.
राजद नेते लालूप्रसाद यादव व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही बैठक आयोजित केली आहे. अखिलेश यादव व ममता बॅनर्जी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे बैठकीला जाण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. परंतु, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी व्यग्रतेचे कारण देत बैठक पुढे ढकलण्याचा आग्रह केला, काँग्रेसनेही पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी उपलब्ध नसल्याचे सांगून २३ जून रोजी बैठक ठेवण्याची विनंती केली आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची अनुपस्थिती व ममतांच्या उपस्थितीने माकप नेते सीताराम येचुरी यांची अडचण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येचुरींनीही व्यग्रतेचा हवाला दिला आहे.
डिसेंबरनंतर काय होणार?
काँग्रेस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत विरोधकांचे ऐक्य ठेवू इच्छित आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेऊ इच्छित नाही. तोपर्यंत अनेक राज्यांत निवडणूक जिंकून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू इच्छित आहे. पक्षाला वाटते की, तोपर्यंत इतर सहयोगींवरील तपास यंत्रणांचा दबावही संपून जाईल.
कॉंग्रेस सहभागी होणार
येत्या १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत कॉंग्रेस पक्ष सहभागी होणार आहे; मात्र पक्षाकडून नेमके कोण उपस्थित राहतील, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ते या बैठकीत पक्षाचे नेतृत्व करतील की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही, असेही रमेश यांनी स्षष्ट केले.
नितीश यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत : सुशील मोदी
देशातील विविध पक्षांना एकत्र आणण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा प्रयत्न हा केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे.
प्रत्यक्षात त्याचा त्यांना काहीही उपयोग होणार नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुशील मोदी यांनी केली.
नितीशकुमार यांना बिहारमध्येच घेरण्याची भाजपची रणनीती
संजय शर्मा
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या तयारीला लागलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बिहारमध्येच घेरण्याची भाजप रणनीती तयार करीत आहे. या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतील व्यासपीठावर नितीशकुमार यांच्या सहकाऱ्यांना बोलावण्याची तयारी सुरू झाली आहे.
नितीशकुमार आता विरोधकांचे नेते होत असून, त्यामुळे आता भाजपने थेट नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नितीशकुमार यांचा सहयोगी पक्ष हम पार्टीचे नेते, माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी व विकासशील इन्सान पार्टीचे नेते मुकेश साहनी, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह व लोक जनशक्ती पार्टीच्या दोन गटांचे नेते, केंद्रीय मंत्री पशुपती पारस व चिराग पासवान यांना पंतप्रधानांच्या पाटण्यातील जाहीर सभेत व्यासपीठावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नितीशकुमार ज्या पद्धतीने देशभरात फिरून विरोधकांना मोदी सरकार व भाजपच्या विरोधात एकजूट करण्याची मोहीम चालवत आहेत. त्यामुळे नितीशकुमार थेट भाजप व मोदी सरकारच्या निशाण्यावर आले.