विरोधी एकजुटीचा विजय , विधानसभेच्या ११ पैकी १० जागांवर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:01 AM2018-06-01T05:01:30+5:302018-06-01T05:01:30+5:30

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात भाजपाच्या विरोधात देशभरातील पक्ष एकत्र आले होते. त्या एकजुटीचा पोटनिवडणुकीत मोठा विजय झाला आहे. एकाच व्यासपीठावर असलेल्या या सात पक्षांनी भाजपाला चांगलाच दणका दिला आहे.

Opposition unity win; Congress and other opposition parties win 10 seats out of 11 Assembly seats | विरोधी एकजुटीचा विजय , विधानसभेच्या ११ पैकी १० जागांवर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची बाजी

विरोधी एकजुटीचा विजय , विधानसभेच्या ११ पैकी १० जागांवर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची बाजी

Next

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात भाजपाच्या विरोधात देशभरातील पक्ष एकत्र आले होते. त्या एकजुटीचा पोटनिवडणुकीत मोठा विजय झाला आहे. एकाच व्यासपीठावर असलेल्या या सात पक्षांनी भाजपाला चांगलाच दणका दिला आहे.

विधानसभेच्या ११ पैकी १0 जागांसाठी (महाराष्ट्रातील पलुस-केडगाव मतदारसंघातून विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत) आणि लोकसभेच्या ४ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. विधानसभेच्या १0 पैकी केवळ एका जागेवर म्हणजे उत्तराखंडच्या खराली मतदारसंघात भाजपाचा विजय झाला. बाकी सर्व ९ जागांवर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येत बाजी मारताना तेथे भाजपाचा पराभव केला.
लोकसभेच्या ४ पैकी एका जागेवर (पालघर) भाजपा विजयी झाली, तर नागालँडमध्ये भाजपाने पाठिंबा दिलेल्या एनडीपीपीचा उमेदवार निवडून आला. उरलेल्या चारपैकी गोंदिया-भंडारा मतदारसंघात काँग्रेसने पाठिंबा दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तेथे भाजपाला पराभव सहन करावा लागला.
उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात समाजवादी पार्टी, काँग्रेससह अन्य पक्षांनी पाठिंबा दिलेल्या राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवाराने भाजपाला पराभूत केले. गोंदिया-भंडारा व कैराना या दोन्ही ठिकाणी २0१४ साली भाजपाचे उमेदवार निवडून आले होते.

उत्तर प्रदेशात आरएलडीचा विजय
उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांनी भाजपाच्या मृगांका सिंग यांचा ५0 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. योगी आदित्यनाथ व भाजपा यांना हा मोठाच धक्का मानला जातो. फुलपूर व गोरखपूर मतदारसंघांतील पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवामुळे भाजपाने कैरानामध्ये आपली सारी ताकद लावली होती. स्वत: योगी आदित्यनाथ यांनी तिथे सभा तर घेतल्याच, पण भाजपाचे अनेक मंत्री तिथे तळ ठोकून होते. असे असताना भाजपाला दारुण पराभव सहन करावा लागला. राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांना काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा या सर्वच पक्षांचा पाठिेंबा होता. २0१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी तसेच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी हे सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. पण ते एकत्र आल्याने त्यांच्या मतांतील फाटाफूट टळली. तसेच उत्तर प्रदेशात वाढत चाललेली गुन्हेगारी, बलात्काराच्या घटना तसेच दलित व अल्पसंख्याकांच्या बाबतीत आदित्यनाथ सरकारचे धोरण यामुळे लोकांनी भाजपाला दूर फेकले.

आर.आर. नगर ठरला काँग्रेसचा बालेकिल्ला
कर्नाटकातील बंगळुरू शहरातील आर. आर. नगर मतदारसंघातील निवडणूक जी पुढे ढकलण्यात आली होती, तेथे सोमवारी मतदान झाले. तेथे अपेक्षेनुसार काँग्रेसचे एन. मुनीरत्न हे विजयी झाले. तेथे त्यांनी भाजपा तसेच जनता दल (सेक्युलर) च्या उमेदवारांना पराभूत केले. या मतदारसंघातून मुनीरत्न तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

पंजाबात काँग्रेसच, अकालींकडून खेचला शाहकोट
पंजाबमधील शाहकोट मतदारसंघात काँग्रेसने अकाली दलाला धूळ चारली. ही जागा अकाली दलाकडे होती. तेथील आमदाराच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. काँग्रेसचे हरदेव सिंग लाडी यांनी अकाली दलाचे नजीब सिंग कोहर यांना ३८ हजार ८0१ मतांनी पराभूत केले आहे.

मेघालयातील अंपाती जिंकून काँग्रेस बनला सर्वात मोठा पक्ष
मेघालयातील अंपाती मतदारसंघातून काँग्रेसच्या मियानी डी शिरा यांनी तेथील सत्ताधारी भाजपाप्रणीत एनपीपीचे क्लेमंट जी. मोमिन यांचा ३१९१ मतांनी पराभव केला. याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे नेते मुकुल संगमा दोन जागांवरून निवडून आले होते. त्यांनी अंपाती मतदारसंघाचा राजीनामा दिल्याने तिथे निवडणूक झाली. मियानी डी शिरा या मुकुल संगमा यांच्या कन्या आहेत. मुकुल संगमा यांच्या पत्नीही विधानसभा सदस्य आहेत. आता एका घरातील तीन जण आमदार झाले आहेत. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मेघालयात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तेथील ६0 पैकी २१ आमदार काँग्रेसचे आहेत, तर सत्ताधारी एनपीपीच्या आमदारांची संख्या २0 आहे.

मार्क्सवाद्यांनी केरळचा गड राखला
केरळमधील चेंगनूर मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. तिथे त्या पक्षाचे साजी चेरियन यांनी २0 हजार ९५६ मतांनी आपल्या विरोधकास पराभूत केले. ती जागा याआधीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडेच होती.

बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची नितीश कुमार यांच्यावर मात
बिहारमध्ये जोकीहाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार शाहनवाझ आलम यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) चे मुर्शीद आलम यांचा ४१ हजार मतांनी पराभव केला. हा नितीश कुमार यांना मोठा धक्काच आहे. याआधी सलग तीन वेळा या जागेवर जनता दल संयुक्त)चा विजय झाला होता.

यूपीत भाजपावर सपाचा विजय
उत्तर प्रदेशातील नूरपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नईम उल हसन यांनी भाजपाला ६२११ मतांनी पराभूत केले आहे. सपाला बसपा, काँग्रेस व राष्ट्रीय लोक दलाने पाठिंबा दिला होता. भाजपा आमदाराच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. ती टिकवण्यात भाजपाला यश आले नाही.

प. बंगालमध्ये तृणमूलची विजयी पताका

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजयाची पताका फडकतच ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांत तृणमूललाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तिथे महेशतला मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार दुलाल दास यांनी भाजपाचे सुजीत घोष यांना ६२ हजार ८३१ मतांनी पराभूत केले. तिथे डाव्या आघाडीचा उमेदवार तिसºया क्रमांकावर फेकला गेला. ती जागा तृणमूलच्या एका आमदाराच्या निधनामुळे रिकामी झाली होती.

यूपीत सलग
तीन जागांवर भाजपाचा पराभव
दोन महिन्यांपूर्वी फुलपूर व गोरखपूर या दोन मतदारसंघांतही झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला होता. म्हणजेच उत्तर प्रदेशातील सलग तीन जागांवर भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

भंडारा-गोंदियात मारली बाजी
महाराष्ट्रातील या जागेवर भाजपाचे हेमंत पटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव कुकडे यांच्यात लढत होती. कुकडे यांनी दणदणीत विजय मिळवला. ही जागा भाजपाकडे होती मात्र नाना पटोले यांनी राजीनामा देऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथे पोटनिवडणूक झाली.

झारखंडमधील गोमिया पुन्हा झामुमोकडेच
झारखंडमधील गोमिया मतदारसंघात सुरुवातीला भाजपाचा उमेदवार झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारापेक्षा बराच पुढे होता. पण प्रत्यक्षात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बबिता देवी यांनी आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनच्या उमेदवाराचा १३४४ मतांनी पराभव केला. तेथे भाजपाचा उमेदवार तिसºया क्रमांकावर फेकला गेला. झामुमो व भाजपा यांच्या उमेदवारातील मतांचा फरक तब्बल १८ हजारांचा आहे. अर्थात ही जागा याआधी झारखंड मुक्ती मोर्चाकडेच होती.

सिल्लीमध्ये झामुमोचा प्रभाव कायम
झारखंडमधील सिल्ली मतदारसंघातही झारखंड मुक्ती मोर्चानेच बाजी मारली. झामुमोच्या उमेदवार सीमादेवी महतो यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनचे सुदेश महतो यांचा १३ हजार मतांनी पराभव केला. तेथेही भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

भाजपा-एनडीएचा येथे झाला विजय
उत्तराखंडतील खराली भाजपाने कशीबशी राखली
उत्तराखंडातील खराली मतदारसंघातून भाजपाच्या मुन्नीदेवी शाह विजयी झाल्या. तिथे अटीतटीच्या लढतीत त्यांनी काँग्रेसचे जीतराम यांचा सुमारे १९00 मतांनी पराभव केला. ही जागा याआधी भाजपाकडेच होती.

पालघरमध्ये भाजपाचा विजय
महाराष्टÑातील पालघर लोकसभा मतदारसंघात सेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव करत भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळविला.

नागालँड लोकसभा मतदारसंघ
नागालँडमधील याच नावाच्या मतदारसंघात भाजपाचा पाठिंबा असलेल्या सत्ताधारी नॅशनल डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) टोकेहो येफ्तोमी यांनी नागा पीपल्स फ्रंटचे सी. अपोक जमीर यांचा ४0 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. जमीर यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. ती जागा मुख्यमंत्री नैफियू रियो यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झाली होती.

२०१४ मध्ये जिंकल्या
२८२ जागा, उरल्या २७३
मोदी लाटेवर स्वार होत भाजपाने २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांनंतर भाजपाच्या
९ जागा कमी झाल्या आहेत. भाजपाच्या जागा आता २७३वर आल्या आहेत.

मित्रपक्षाने भाजपावर
फोडले पराभवाचे खापर
मित्रपक्ष जनता दल युनायटेडने बिहारमधील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर भाजपावर फोडले आहे. केंद्राच्या धोरणांमुळे पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका व त्यातून निर्माण झालेला संताप मतदानातून लोकांनी व्यक्त केल्याचे, जेडीयूचे महासचिव के.सी. त्यागी यांनी सांगितले.

Web Title: Opposition unity win; Congress and other opposition parties win 10 seats out of 11 Assembly seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.