यूपीएमध्ये मतभेद, नितीश यांचा एनडीएचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा
By admin | Published: June 21, 2017 10:21 PM2017-06-21T22:21:13+5:302017-06-21T22:21:13+5:30
. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून यूपीएमधले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. पाटण्यात संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं यूपीएच्या एकीला सुरूंग लागला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊ भाजपाचा उमेदवार पाडायचा, अशी भूमिका मांडली होती. नितीश कुमार यांनी पाठिंबा दिल्यानं रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदावरचा दावा आणखी भक्कम झाला आहे. नितीश यांच्या पाठिंब्यामुळे कोविंद यांना 70 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएसुद्धा लवकरात लवकर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे देण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुख आणि द्रमुक पक्षानंसुद्धा कोविंद यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोविंद यांना अनेक पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यानं काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सोबत राहावेत यासाठी काँग्रेसकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र नितीश कुमार यांनी कोविंद यांच्या पारड्यात वजन टाकल्यानं काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांसोबतच राहू, असा विश्वास काँग्रेससह यूपीएला दिला होता. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत नितीश कुमार यांची चर्चासुद्धा झाली होती. नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर करताना कारणंही स्पष्ट केली आहेत. रामनाथ कोविंद बिहारच्या राज्यपालपदी त्यांनी कधीही सरकारसमोर अडचणी निर्माण केल्या नाहीत. त्यामुळेच नितीश कुमारांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे.