वंदे मातरमला विरोध हा कोतेपणा - योगी आदित्यनाथ
By admin | Published: April 8, 2017 11:34 PM2017-04-08T23:34:02+5:302017-04-08T23:34:02+5:30
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला विरोध करणे हा कोतेपणा असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 8 - वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला विरोध करणे हा कोतेपणा असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मेरठ अलाहाबादसह अनेक पालिकांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावरून निर्माण निर्माण झालेल्या विवादावर प्रतिक्रिया देताना आदित्यनाथ यांनी आपले मत मांडले.
राजभवनामध्ये झालेल्या द गव्हर्नर्स गाइड या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहात बोलताना ते म्हणाले, "आम्ही 21व्या शतकात भारताला पुढे घेऊन जाऊ इच्छित आहोत. पण आज राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत गावे की न गावे यावरून वाद होताहेत, ही चिंतेची बाब आहे. हा विवाद कोतेपणा दर्शवतो."
यावेळी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या स्थापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. "हायकोर्टाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गायन झाले होते. त्यावेळी पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि राज्यपाल उपस्थित होते. पण आज या मुद्यावरून वाद होत आहे. काही लोक म्हणताहेत की आम्ही राष्ट्रगीत गाणार नाही. असे म्हणणे हा कोतेपणा आहे. या कोतेपणातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढावा लागेल."
उत्तर प्रदेशमधील पालिकांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्यावरून वाद सुरू झाला आहे. या वादाची सुरुवात मेरठ येथून झाली. तेथे काही नगरसेवकांनी वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिला. त्यानंतर अलाहाबाद पालिकेत भाजपाच्या नगरसेवकांनी कामकाजाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध केला. अशाच प्रकारचा वाद बरेली आणि वाराणसीच्या पालिकांमध्येही झाला होता.