आधी लग्न विधानसभेचं...मगच लोकसभेचं! सिक्कीममध्ये मुख्यमंत्री चामलिंग यांच्याविरोधात विरोधक एकवटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:31 AM2019-03-20T05:31:46+5:302019-03-20T05:33:14+5:30
सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) सर्वेसर्वा पवनकुमार चामलिंग नेहमीप्रमाणे यंदाही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसत आहेत.
- कुंदन पाटील
गंगटोक : सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) सर्वेसर्वा पवनकुमार चामलिंग नेहमीप्रमाणे यंदाही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात चामलिंग यांना रोखल्याशिवाय लोकसभेच्या एका जागेचे स्वप्न पाहता येणार नाही, हे विरोधकांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे सर्वच विरोधक चामलिंग यांना शह देण्यासाठी एका तंबूत दाखल होण्याच्या तयारीत आहेत.
सिक्किममध्ये लोकसभेच्या एक आणि विधानसभेच्या ३२ जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गेली २५ वर्षे म्हणजेच १२ डिसेंबर १९९४ पासून सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रिपद असणाऱ्या चामलिंग यांना यंदाची निवडणूक काहीशी आव्हानात्मक ठरणार आहे. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटचा मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत अन्य घटक पक्षांचा समावेश होण्याची शक्यता असताना सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) हा प्रबळ विरोधक रिंगणात असेल. राजकारणात प्रवेश केलेले माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांच्या हमरो सिक्किम पार्टी (एचएसपी) या पक्षाने सिक्किममधील एकमेव लोकसभा जागा, तसेच विधानसभेच्या सर्व ३२ जागा लढविण्याचा
निर्णय घेतला आहे. भूतिया मात्र राजकीय मैदानात फारसे प्रभावी ठरणार नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. तिकडे एसकेएमचे अध्यक्ष पी.एस.गोले यांंनी चामलिंग यांच्याशी दोन हात करण्याची तयारी सुरू ठेवली आहे.
गोले यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने वर्षभराचा कारावास ठोठावला होता. कारावास भोगून आल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सिक्किमच्या
राजकीय आखाड्यावर लक्ष केंद्रित केल्यास ही निवडणूक अटीतटीची होणार, असे दिसते.
राय यांना पुन्हा संधी
लोकसभेच्या एका जागेसाठी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या प्रेमदास राय यांना पुन्हा संधी देण्याच्या तयारीत आहे. राय हे खडकपूर आयआयटीचे विद्यार्थी. युवकांमध्ये त्यांच्या नावाची क्रेझही आहे.‘स्वच्छ चेहरा’ ही त्यांची जमेची बाजू आहे.
या योजना तारणार चामलिंग यांना ?
भाजपाने स्थापन केलेल्या नॉर्थईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा घटक असूनही ‘एसडीएफ’ स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सरकारकडून किमान उत्पन्न म्हणून काही ठराविक रक्कम दरमहा देण्याची देशातील पहिली योजना राबविण्याच्या घोषणेचे ‘एसडीएफ’ला किती फायदा होतो, हे पाहणेही लक्षणीय ठरेल. तसेच चामलिंग यांची ‘घर तेथे रोजगार’ ही योजना सिक्कीमकरांच्या मनात घर करुन गेली आहे.त्यामुळे चामलिंगांचा विजयरथ रोखताना विरोधकांना घाम फुटणार आहे. देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून सिक्कीम ओळखू जाऊ लागले ते मुख्यमंत्री चामलिंग यांच्यामुळेच. सेंद्रीय शेतीमुळेही हे राज्य जगाच्या नकाशावर आले आहे. त्यासाठी पावले टाकणाऱ्या चामलिंग यांनी आपले लक्ष्य जवळपास पूर्ण केल्याने राज्याच्या व तेथील जनतेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.