विरोधकांनो देशाला वाचवण्यासाठी एक व्हा; तेलुगू देसमने NDA सोडल्यानंतर ममता बॅनर्जींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:57 AM2018-03-16T11:57:13+5:302018-03-16T11:57:39+5:30
देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे.
नवी दिल्ली: वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव आणि शुक्रवारी तेलुगू देसमने पक्षाने तडकाफडकी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींनी कमालीचा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एक आवाहन केले आहे. मी तेलुगू देसमच्या रालोआतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे स्वागत करते. देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्षांनी अत्याचार, आर्थिक संकट, राजकीय अस्थिरतेच्याविरोधात एकत्र यावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.
I welcome the TDP's decision to leave the NDA. The current situation warrants such action to save the country from disaster. I appeal to all political parties in the Opposition to work closely together against atrocities, economic calamity&political instability: Mamata Banerjee pic.twitter.com/zRKBWMdKbL
— ANI (@ANI) March 16, 2018
वायएसआर काँग्रेसकडून शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानेही आज सकाळी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते. परंतु, काही वेळापूर्वीच शिवसेनेतील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबद्दलची माहिती दिली. तेलुगू देसमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, आम्ही मतदानाच्यावेळी तटस्थ राहू, असे या नेत्यांनी सांगितले.
टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी तेलुगू देसमने केली असून, ती मान्य होत नसल्याने गेल्याच आठवड्यात तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी तेलुगू देसमने एनडीएतच राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र तरीही मागणी मान्य होत नसल्याने नायडू हे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.