संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेचे प्रश्न हद्दपार, विरोधी पक्षाच्या खासदारांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:48 PM2022-04-08T12:48:39+5:302022-04-08T12:49:38+5:30
Politics News: लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.
नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्तारूढ पक्षातर्फे सभागृह चालविण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकार जनविरोधी -प्रियंका चतुर्वेदी
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभापतींकडे अनेकदा विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केला. या सूचनांवर सभापती महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. सरकारची भूमिका जनविरोधी आहे.” विधेयक संमत करण्याशिवाय कोणतेही काम या अधिवेशनात झालेले नसल्याचा आरोप खासदार चतुर्वेदी यांनी केला.
बोगस अधिवेशन -बाळू धानोरकर
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, या अधिवेशनातून सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही. एक बोगस असे या अधिवेशनाला म्हणता येईल. सत्तारूढ पक्षाकडून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेले जात आहे. सामान्यांचे प्रश्न मात्र चर्चेला येत नाहीत. महागाईविरोधात विरोधकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, असे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सांगितले.
सरकार बेमुरवत - सुनील तटकरे
केंद्र सरकार हे बेमुर्वत असून, जनतेच्या प्रश्नांना या सरकारच्या लेखी काहीही महत्त्व नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सातत्याने सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठपुरावा केला.
परंतु, सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शक्य होऊ शकले नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.
अधिवेशन यशस्वी - गिरीश बापट
अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला. जनतेच्या विकासासाठी असलेली अनेक विधेयके संसदेने संमत केली. प्रश्नोत्तरे, विविध विषयांवर झालेल्या चर्चेत जनतेच्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.