राज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:56 AM2018-06-26T03:56:50+5:302018-06-26T03:57:00+5:30
संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत की, उपसभापतीपद हे राज्यसभेतील विरोधी पक्षातील एखाद्या सदस्यास दिले जावे. विद्यमान उपसभापती पी.जे कुरीयन हे निवृत्त होत असल्याने ही जागा रिक्त होत आहे.
असे समजले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा यांच्यासह पक्षाच्या संसदीय समितीशी यावर विचारविनिमय केला आहे आणि असे संकेत दिले आहेत की, भाजप या पदावर दावा करणार नाही. सत्तारुढ भाजप राज्यसभेत ६९ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस व समविचारी पक्ष राज्यसभेत इच्छित संख्या गाठू शकणार नाहीत. २४४ सदस्यसंख्येच्या सभागृहात भाजपा आणि सहकारी पक्षांकडे १०९ सदस्य आहेत. शरद यादव यांची एक जागा रिक्त आहे. तीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर एनडीएची संख्या ११२ वर पोहचेल. जर बीजेडीने भाजपचा प्रस्ताव स्वीकारला तर ही संख्या ११७ वर जाते. जर टीआरएसही (६) राजी झाले तर हा आकडा १२३ वर जाईल. म्हणजेच एनडीएकडे बहुमत होईल.
हे पद बिजू जनता दल किंवा तेलंगणा राष्ट्र समिती वा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला देण्याचा विचार आहे. हे पक्ष भाजपा- काँग्रेसपासून समान अंतर राखून आहेत.
भाजपाच्या मते तृणमूलचे ज्येष्ठ नेते शुबेंदू शेखर रॉय हे या पदासाठी सक्षम आहेत.
तेलंगणा राष्ट्रीय समिती वा बीजू जनता दल यापैकी कुणीही हे पद स्वीकारले तर भाजपला त्याचा अतिशय आनंद होईल. कारण, अन्य विरोधी पक्ष याला विरोध करु शकणार नाहीत.