रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार विमानाने प्रवास करण्याचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 09:59 AM2017-10-23T09:59:59+5:302017-10-23T10:02:42+5:30
अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे
नवी दिल्ली - जर तुम्ही राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत असाल, आणि एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याचा पर्याय मिळू शकतो. पण ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे.
रेल्वेमध्ये मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा फरक असल्या कारणाने कन्फर्म तिकीट न मिळणा-या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एअर इंडियाचे चेअरमन असताना अश्वनी लोहानी यांनी ही संकल्पना समोर मांडली होती. त्यानुसार जर रेल्वेने अशा प्रवाशांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एअर इंडियासोबत शेअर केल्यास त्यांनी विमानातून प्रवास करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. अश्वनी लोहानी यांनी सांगितल्यानुसार, 'राजधानीच्या एसी-2 च्या भाड्यात आणि विमानाच्या तिकीट दरात जास्त अंतर नाही'.
दरम्यान, दुसरीकडे सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न असून खासगी कंपनीला विकणार असल्याची माहिती आहे. प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत एअर इंडिया पुन्हा रेल्वेसमोर हा प्रस्ताव ठेवते का हे पाहावं लागेल.
एअर इंडियाशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी एअरलाईन असल्याचा हा फायदा असून, रेल्वे आपल्या कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना आमच्याकडे पाठवू शकतात. अश्वनी लोहानी यांची ही संकल्पना खरंच चांगली आहे. मात्र रेल्व एका खासगी एअरलाइनसोबत असं करु शकेल का ? त्यांच्यावर खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप करण्यात येईल'.
अश्वनी लोहानी यांना रेल्वे बोर्डाचं चेअरमन करण्यात आल्यानंतर, एअर इंडियाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणा-या वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव बन्सल यांनी आपण या प्रस्तावावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं सांगितलं आहे. 'मी पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकत आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात फरक असतो'.