दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:18 AM2024-04-19T05:18:53+5:302024-04-19T05:22:00+5:30
काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे.
चेन्नई : काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे. त्यादृष्टीने महत्त्वाच्या तामिळनाडूमध्ये सर्व ३९ जागांवर पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिलला मतदान हाेत आहे. भाजप आणि राज्यातील सत्ताधारी डिएमकेमध्ये खरी लढत असून दाेन्ही पक्षांसाठी ही अग्निपरीक्षा आहे.
पहिल्या टप्प्यात दक्षिणेकडील तामिळनाडूसह कन्याकुमारी, लक्षद्वीप तसेच अंदमान आणि नकाेबार द्वीपसमूह येथे मतदान हाेत आहे. दक्षिणेकडील अग्निपरीक्षेची सुरूवात याच ठिकाणांवरुन हाेत आहे. तामिळनाडूत भाजपने २३ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर इतर ठिकाणी एनडीएतील घटक पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. एआयएडीएमके यावेळी भाजपसाेबत नाही. भाजपने पीएमकेसाेबत यावेळी युती केली आहे. पीएमके १० जागांवर तर मूपनार यांचा टीएमसी हा पक्ष ३ जागा लढवित आहे.
राज्याचे चित्र?
एकूण जागा - ३९
मतदार ६.२३ काेटी
मतदान केंद्र ६८ हजार
गेल्या निवडणुकीत काय झाले हाेते?
डीएमके ३८
एआयएडीएमके १
मतांची टक्केवारी
भाजप ३.६६
डीएमके ३३.५२
एआयएडीएमके १९.५९
काॅंग्रेस १२.६१
माेदींच्या प्रचाराचा झंझावात
तामिळनाडूमध्ये विजयासाठी भाजपने जाेर लावला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गेल्या १० आठवड्यांमध्ये ७ वेळा राज्याचा दाैरा केला आहे. निवडणूक जाहीर हाेण्यापूर्वीपासून भाजपने तामिळनाडूवर लक्ष केंद्रीत केले हाेते. त्यास किती यश मिळाले, हे निकालानंतरच स्पष्ट हाेईल.
डीएमकेसमाेर आव्हान
डीएमके हा इंडिया आघाडीचा घटक आहे. हा पक्ष २२ जागांवर, तर काॅंग्रेस ९, माकप २, भाकप २, मुस्लीम लीग १, एमडीएमके १ आणि व्हीसीके एका जागेवर लढत आहे. तर एआयएडीएमके ३४ जागांवर लढत असून त्यांचा मित्रपक्ष डीएमडीके ५ जागा लढवित आहेत.